पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ जुलै रोजी संयुक्त राष्ट्रात अतिशय महत्त्वपूर्ण संबोधन करणार आहेत. संयुक्त राष्ट्र संघाच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला न्यूयॉर्कमध्ये पार पडणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करणार आहेत. संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायम प्रतिनिधी टीएस तिरूमूर्ती यांच्यानुसार संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील (UNSC) विजयानंतर पंतप्रधानांचं हे पहिलंच भाषण असेल. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला (UNGA) संबोधित केलं होतं. तसंच त्यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला दहशतवादाविरोधात एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं.

यावर्षी भारताची दोन वर्षांसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिदेच्या अस्थायी सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती. भारताला १९२ पैकी १८४ मतं मिळाली होती. या सुरक्षा परिषदेत अमेरिका, युनायटेड किंगडम. फ्रान्स, रशिया आणि चीन हे स्थायी सदस्य आहेत. तर त्यांच्याव्यतिरिक्त १० अस्थायी सदस्यदेखील असतात. यापूर्वीही भारत सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य होता. १९५०-५१, १९६७-६८, १९७२-७३, १९७७-७८, १९८४-८५, १९९१-९२ आणि २०११-१२ मध्ये भारताची अस्थायी सदस्य म्हणून निव़ड झाली होती.

अधिक वाचा  शरद पवारगटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी; यंदा तिरंगी लढती अनिवार्यच? बारामती, माढा, बीडमधून कोण?

यापूर्वी काय म्हणाले होते मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी संयुक्त राष्ट्राला संबोधित करताना त्याच्या विस्तार करण्याची इच्छा व्यक्त केली होती. “संयुक्त राष्ट्रासारखी संघटना असतानाही अनेक जी समूह तयार झाले आहेत. भारत अशातील काही समुहांचा भाग आहे. अशा निरनिराळ्या समुहांपेक्षा एकच जी ऑल तयार केला पाहिजे,” असं ते म्हणाले होते. तसंच यावेळी त्यांनी भारतीय संस्कृतीबद्दल सांगताना योग आणि लोकशाहीचं महत्त्वदेखील सांगितलं होतं. तसंच गरीबी आणि दहशतवादाविरोधात बोलताना त्यांनी पाकिस्तानवरही निशाणा साधला होता.