पुणे : शहरात घरोघरी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे संकलन करण्यासाठी महापालिके ने नियुक्त के लेल्या ‘स्वच्छ’ संस्थेचे काम काढून घेण्याचा घाट बाणेर-बालेवाडी-पाषाणमधील नगरसेवकांनी घातला आहे. स्वच्छ संस्थेचे काम असमाधानकारक असल्यामुळे बाणेर-बालेवाडी-पाषाण या प्रभागातील काम गजानन एंटरप्रायझेस या संस्थेला देण्यात यावे, असा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नगरसेवकांनी स्थायी समितीला दिला आहे. ही संस्था विनामोबदला काम करण्यास तयार आहे, असा दावा नगरसेवकांनी केला आहे. स्वच्छ संस्थेचे काम समाधानकारक नसल्यास करारनाम्यातील अटी-शर्तीनुसार संस्था बदलण्याचे अधिकार महापालिकेला असताना नगरसेवकांनी हा प्रस्ताव कसा दिला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शहरातील घरोघरी निर्माण होणाऱ्या वर्गीकृत कचऱ्याचे संकलन करण्यासाटी स्वच्छ सेवा सहकारी संस्थेची निवड करण्यात आली आहे. पाच वर्षांसाठी महापालिकेने स्वच्छ संस्थेबाबत करार केला आहे. या संस्थेस महापालिकेकडून वार्षिक पाच कोटी रुपये या कामासाठी दिले जातात. यापूर्वी स्वच्छ संस्थेचे कर्मचारी योग्य प्रकारे काम करत नसल्याचे आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी वेळोवेळी मुख्य सभेत केले होते. मात्र सध्या करोना विषाणू संकटाच्या कालावधीत स्वच्छ संस्थेकडून सामाजिक जाणिवेतून स्वच्छतेच्या कामात कोणताही खंड पडू देण्यात आला नाही.

अधिक वाचा  महायुती-मविआसाठी ‘या’ जागा डोकेदुखी का ठरल्यात?घराणेशाही, राजकीय जातीय समीकरणे अजूनही गुंताचं!

टाळेबंदीमुळे संचार आणि सार्वजनिक वाहतुकीवर आलेले निर्बंध, पोलिसांची अरेरावी, सोसायटय़ा, गृहसंकुलाकडून कचरा संकलनास होत असलेला विरोध अशा विरोधी वातावरणातही महापालिका कर्मचाऱ्यांबरोबरच स्वच्छ संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेच्या कामात कोणताही खंड पडू दिला नाही. त्यांच्या या कामाची दखल अनेक सोसायटय़ांनीही घेतली होती. अनेक सोसायटय़ा, गृहनिर्माण संस्थांनी कचरासेविकांचा सन्मानही केला होता.

महापालिका प्रशासनाकडूनही स्वच्छ संस्थेच्या कचरा सेविकांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी त्यांच्या प्रोत्साहन भत्त्यामध्ये घरटी दहा रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या परिस्थितीत करोना कालावधीत स्वच्छ संस्थेचे काम चांगले असतानाही त्यांचे काम काढून घेण्याचा घाट घालण्यात आला आहे. नगरसेवक, शहर सुधारणा समिती अध्यक्ष अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर आणि स्वप्नाली सायकर यांनी याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीला दिला आहे.

अधिक वाचा  राजकीय पक्षांच्या खर्च नियंत्रणाची सर्व नियमावली ठरली; प्रचारक माणसांचा ‘रेट’ नाश्ता जेवण मंडप होर्डिंगचे हे दर

बाणेर-बालेवाडी-पाषाण प्रभागात स्वच्छ संस्थेची एकाधिकारशाही झाली आहे. या संस्थेकडून कचरा संकलन योग्य प्रकारे होत नाही. नागरिकांकडूनही त्याबाबतच्या तक्रारी आहेत. त्याउलट प्रभागातील सोसायटय़ा आणि गावठाण भागात गजानन कृपा एंटरप्रायझेस या संस्थेने टाळेबंदीच्या कालावधीत कचरा संकलनाचे काम योग्य प्रकारे केले. ही संस्था यापुढेही विनामोबदला काम करण्यास तयार आहे. स्वच्छ संस्थेप्रमाणे घंटागाडी आणि अन्य साहित्य त्यांना उपलब्ध करून द्यावे लागणार नाही. ही संस्था ओला कचरा ज्या-त्या सोसायटय़ांमध्येच जिरविण्यासाठी उपाययोजना करणार आहे. त्यामुळे गजानन एंटरप्रायझेस या संस्थेला हे काम द्यावे, असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

अधिक वाचा  राष्ट्रवादीनं साताऱ्यावरील आग्रह सोडला? “सातारा सोडतो पण त्या बदल्यात…”

महापालिकेने स्वच्छ संस्थेबरोबर शहरासाठी करार केला आहे. त्यामुळे या प्रस्तावावर निर्णय घेता येणार नाही. त्यावर अभिप्राय देण्यात येईल. मात्र अशा पद्धतीने दुसऱ्या संस्थेला काम देता येणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहून त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.
– ज्ञानेश्वर मोळक, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख

गजानन संस्थेचे काम चांगले आहे. विनामोबदला काम करण्याची संस्थेची तयारी आहे. स्वच्छ संस्थेच्या करारनाम्यातही संस्थेचे काम हस्तांतरीत करण्याची तरतूद आहे. हा प्रस्ताव कायदेशीरदृष्टय़ा योग्य आहे. क्षेत्रीय कार्यालयाकडूनही काम देण्याबाबतचा सकारात्मक अभिप्राय अतिरिक्त आयुक्त कार्यालयाला देण्यात आला आहे.
– अमोल बालवडकर, अध्यक्ष, शहर सुधारणा समिती