इंदापूर : इंदापूर तालुक्यात कोरोनाचा उद्रेक पुन्हा पाहायला मिळत आहे. कोरोनानं पाचवा बळी घेतला असून लासुर्णे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारीकेलाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे.

लासूर्णे , भिगवण स्टेशन या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. इंदापूर तालुक्यात कोविड केआर सेंटरमध्ये कोरोनाच्या रुग्णावर उपचार केले जात आहेत. वरचेवर सापडणाऱ्या रुग्णांच्या संखेत वाढ होत असल्याने तालुक्यात सध्या चिंतेचे वातावरण आहे. दुसरीकडे, पुणे शहर आणि परिसरात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरूवारी एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमध्येही पुन्हा लॉकडाऊन जाहीर केला आहे. 13 जुलै ते 23 जुलै या कालावधीत दोन्ही शहरांमध्ये कडक लॉकडाऊन असणार आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढत चालला आहे. एकट्या पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून दररोज सरासरी एक हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत.

अधिक वाचा  ‘पांड्या खुश नाहीये, तो फक्त हसतोय…’,या माजी क्रिकेटपटूने केली कॅप्टन हार्दिकची पोलखोल

पिंपरी चिंचवडमध्येही वेगाने वाढ
पुणे सरासरी वाढ तेवढीच राहिल्याचं दिसत आहे, मात्र पिंपरी चिंचवड रुग्णांची संख्या तीनशेवरून पाचशेवर गेल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील सरासरी वाढ पन्नासवरून दीडशेच्या जवळपास पोहोचली आहे, म्हणूनच शहरालगतची 20 गावं पुन्हा सीलबंद केली आहेत. पुणे जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या 34399 तर पुणे शहरातील 25 हजारांवर गेली आहे.

दरम्यान, कोरोनाचा फैलाव वाढू लागल्याने शहरालगत हिंजवडी आणि मारुंजी परिसरात कालपासूनच 8 दिवस कडक निर्बंध लागू केले आहेत. 9 जुलै ते 16 जुलै दरम्यान केवळ दूध, मेडिकल आणि दवाखाने सुरू असतील. तसंच या भागातील आयटी कंपन्यांना मात्र सूट देण्यात आली आहे.

अधिक वाचा  महाराष्ट्रातील या बँकेवर आरबीआयचे सहा महिन्यासाठी निर्बंध, जाणून घ्या काय असणार पर्याय

दुसरीकडे, हवेली तालुक्यातील नांदेड गाव, खडकवासला, किरकीटवाडी ,नऱ्हे,मांजरी, पिसोळी, वाघोली, न्यू कोपरे,खानापूर,गुजर निंबाळकरवाडी,वडाची वाडी, लोणी काळभोर,भिलारे वाडी ,उरुळी कांचन, शेवाळेवाडी, भिलारे वाडी कदमाक वस्ती,कुंजीर वाडी भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला होता.

राज्यात गेले काही दिवस 6000 वर कोरोना रुग्णांची दररोज भर पडत आहे. त्यात किंचित घट झाल्यानंतर गेल्या 24 तासांमध्ये मात्र राज्यात पुन्हा एकदा उद्रेक पाहायला मिळाला. दिवसभरात 7862 रुग्ण आढळून आलेत. तर 226 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. 5366 रुग्णांना बरं होऊन घरी सोडण्यात आलं. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 2,38,461 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 9893 वर गेला आहे.

अधिक वाचा  मोदींच्या सभेचे ना निमंत्रण, ना भाषणाची संधी; राष्ट्रवादीत नाराजीचा सूर, अध्यक्षांनाही नाही व्यासपीठावर स्थान

त्याचबरोबर ठाणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या ठाणे जिल्ह्यात आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात 12 जुलैपर्यंत असलेला लॉकडाऊन आता 19 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. याबाबत ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी आदेश दिले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेनेही असेच आदेश दिले आहेत.