मुंबई : पोलीस उपअधीक्षक आणि सहायक पोलीस उपायुक्त यांची विभागीय परीक्षा आता ऑगस्टमध्ये घेण्यात येणार असून, त्यांना पुस्तक घेऊन परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शक्रवारी दिली.
करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस यंत्रणेवर कामाचा प्रचंड ताण आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करण्यासाठी संबंधितांना पुरेसा कालावधी उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याची मागणी राज्यातून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आली होती. त्यावर हा निर्णय घेण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले.
या वर्षांसाठीच्या दोन परीक्षांकरिता पुस्तकांसहित परीक्षेची परवानगी दिली आहे. पोलीस उपअधीक्षक व सहायक पोलीस आयुक्त या पदावर सरळसेवेने नियुक्त झालेल्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांसाठी, त्यांचा परिविक्षाधीन कालावधी संपल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत या विभागीय परीक्षेचे आयोजन करण्यात येत असते. ही परीक्षा वर्षांतून दोन वेळा घेतली जाते. मात्र जुलै २०१३ नंतर आयोगामार्फत अशी विभागीय परीक्षा आयोजित करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यातील १८२ अधिकारी ही परीक्षा देणे बाकी आहेत.
या परीक्षांचा अभ्यासक्रम सुधारित करण्यात आला असून ही परीक्षा आता अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) आणि महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक यांच्यामार्फत घेण्यात येणार आहे, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.