बीजिंग: चीनच्या आक्रमक विस्तारवादी भूमिकेनंतर शेजारी देशांसोबत त्यांचा वाद वाढला आहे. भारताने चीनच्या आक्रमकतेला उत्तर देताना चिनी कंपन्यांचे ५९ अॅप्सवर बंदी आणली. भारताच्या या निर्णयाचे अमेरिकेने स्वागत केल्यानंतर चीनचा थयथयाट सुरू झाला आहे. अमेरिकेचे सध्या वर्तन हे चिअरलीडरसारखे असल्याची टीका चीनने केली आहे.

चीन सरकारच्या मालकीचे वृत्तपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’ ने अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांच्यावर जोरदार टीका केली. पोम्पिओ हे सातत्याने खोटं बोलत असून बरगळत असतात. भारत-चीनच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर अमेरिका चिअरलीडरसारखे वर्तवणूक करत असल्याचे ‘ग्लोबल टाइम्स’ने आपल्या अग्रलेखात म्हटले आहे. भारत-चीन संबंधांमध्ये आणखी तणाव निर्माण व्हावा, अशी अमेरिकेची इच्छा आहे. भारत-चीनमध्ये ताणलेल्या संबंधात अमेरिका आगीत तेल टाकत असल्याची टीका ग्लोबल टाइम्सने केली आहे.

अधिक वाचा  संतोष देशमुख प्रकरणात ट्विस्ट, कृष्णा आंधळेचा साथीदार कोण?ओळख पटवल्यानंतर ज्या प्रमाणे बाईक पळवली, त्यानुसार त्याला…

अमेरिकेने भारताला पाठिंबा दिल्यानंतर भारतामध्ये त्याचे स्वागत झाले. चीनचा यामुळेही जळफळाट झाला असून त्यांनी भारतीय माध्यमांवर टीका केली आहे. भारतीय माध्यमांमध्ये उत्सवी वातावरण आहे. अमेरिकेच्या पाठिंब्यामुळे चीनने भारतासमोर शरणागती पत्करली असे चित्र भारतीय माध्यमांनी निर्माण केले असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. राष्ट्रवादाच्या नावाखाली भारतात सरकारने तार्किक मुद्यावर पडदा टाकला असून भारत-चीन संबंधांवर डोळसपणे पाहत नसल्याचे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.

मागील काही महिन्यांपासून अमेरिका आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ सातत्याने चीनवर टीका करत आहेत. ग्लोबल टाइम्सने माइक पोम्पिओंवर जोरदार टीका केली आहे. परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ हे सीआयएचे प्रमुख राहिले आहेत. त्यामुळे लोकांना भडकावणे आणि आवाज दाबणे यात ते माहीर आहेत. याआधी ते चार भिंती आड या गोष्टी करायचे आणि आता उघडपणे करत असल्याची टीका ग्लोबल टाइम्सने केली आहे.

अधिक वाचा  आज राज्याचा अकरावा अर्थसंकल्प; वित्तीय तूट २ लाख १० हजार कोटींवर तूट कमी करण्याचे अजित पवारांपुढे आव्हान

दरम्यान, चीनवर दबाव वाढवण्यासाठी भारत सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घातली. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे पडसाद चीनमध्येही उमटले आहेत. चीनच्या सरकारी माध्यमांनी भारत सरकारच्या या निर्णयाविरोधात थयथयाट सुरू केला. भारताचा हा निर्णय म्हणजे अमेरिकन सरकारची नक्कल करण्याचा प्रयत्न असल्याची टीका ‘ग्लोबल टाइम्स’ने काही दिवसांपूर्वी केली. भारताने घेतलेला हा निर्णय म्हणजे अमेरिकेच्याजवळ जाण्याचा प्रयत्न असल्याचे ग्लोबल टाइम्सने म्हटले होते.