बीजिंग: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लडाखमध्ये भेट दिल्याने चीनचा जळफळाट सुरू झाला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या भेटीवर नाराजीचा सूर लावला असून दोन्ही देशांतील वातावरण अधिक बिघडेल असे कोणतेही कृत्य करता कामा नये. परराष्ट्र मंत्रालयाच्या या वक्तव्यानंतर चीनचा जळफळाट झाला असल्याची चर्चा सुरू आहे.
मागील दोन महिन्यांपासून लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यातच जूनमध्ये चीनच्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर परिस्थिती आणखी तणावग्रस्त झाली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमध्ये अचानक भेट देत जवानांशी संवाद साधला.

अधिक वाचा  कोट्यधीश आहेत, पण या उमेदवारास फडणवीसांनी म्हटले होते फकीर, निवडणूक शपथपत्रातून संपत्तीची माहिती समोर

चीनने पंतप्रधान मोदींच्या भेटीवर नाराजी व्यक्त केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिन यांनी सांगितले की, दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तणावात आणखी भर पडेल आणि वातावरण अधिक चिंताजनक होईल असे कृ्त्य दोन्ही देशांनी टाळायला हवे. भारत आणि चीन एकमेकांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी आज सकाळी ११ हजार फूट उंचीवर असलेल्या नीमू तळावर पोहोचले. त्यांनी लष्कर आणि आयटीबीपीच्या जवानांची भेट घेतली आणि त्यांचा उत्साह वाढवला. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांच्यासोबत संरक्षण प्रमुख बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे हे देखील होते.

अधिक वाचा  आम्ही बापाच्या दोन नंबरच्या पैशावर उडत नाही, भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने सदा सरवणकरांच्या मुलाला सुनावलं

आपण प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे संरक्षणासाठी पूर्णपणे वचनबद्ध असल्याचा सूचक संदेश पंतप्रधान मोदींनी चीनला दिला. . इंच इंच पुढे वाढण्याची चीनची कुटील चाल दक्षिण चीन सागरात यशस्वी होऊ शकते, मात्र भारतासमोर त्याची डाळ शिजणार नाही, असा स्पष्ट संदेशच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला दिल्याचे बोलले जात आहे. भारत चीनला सीमेवर मागे हटवण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लडाखला भेट देऊन अतिशय चांगले काम केले असल्याची प्रतिक्रिया संरक्षण क्षेत्राचे तज्ज्ञ ब्रह्मा चेलानी यांनी व्यक्त केली आहे. चीनला मागे हुसकावून लावण्याचा भारताला दृढ संकल्प असल्याचा संदेश लडाखला जाऊन पंतप्रधान मोदी यांनी चीनला दिला असल्याचे चेलानी म्हणाले.