लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांसोबत झालेली चकमक आता चीनच्या कम्युनिस्ट सरकारला महागात पडत असल्याचं दिसत आहे. दरम्यान, या चकमकीत भारतीय जवानांनी चीनच्या ४० जवानांना ठार केलं होतं. ही माहिती लपवल्यामुळे पीपल्स लिबरेशन आर्मीचे माजी अधिकारी आणि विद्यमान सैनिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचं दिसून येत आहे. तसंच ते कोणत्याही क्षणी सरकारविरोधात सशस्त्र आंदोलन करू शकतात अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
वॉशिंग्टन पोस्टच्या ओपिनिअनमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या माजी नेत्याचे पुत्र आणि चीनच्या सिटीझन पॉवर इनिशिएटिव्हचे अध्यक्ष जियानली यांग यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. “गेल्या अनेक वर्षांपासून पीएलए चीनच्या सत्तेतील मुख्य भाग राहिला आहे. जर देशसेवेत काम करणाऱ्या पीएलए केडरच्या भावना दुखावल्या गेल्या तर ते सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांमध्ये सामील होतील आणि देशाच्या सरकारविरूद्ध बंडखोरी करतील,” असं यांग यांनी म्हटलं आहे.
जर आपले अधिक सैनिक ठार झाले हे सरकारनं मान्य केलं तर देशांत अशांतता पसरेल आणि सीपीपीच्या सत्तेलाही धोका निर्माण होऊ शकतो, असं वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रकाशित झालेल्या लेखात यांग यांनी म्हटलं आहे. “पीएलएने आतापर्यंत सीसीपी सरकारसाठी मजबूत आधारस्तंभ म्हणून काम केलं आहे.

अधिक वाचा  ‘वाल्मिक अण्णांना…’, 6 वेळा ‘आवादा’कडे मागितली 2 कोटींची खंडणी

जर पीएलएच्या विद्यमान सैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या (यामध्ये त्या सदस्यांचा समावेश आहे जे शी जिनपिंग यांच्यावर नाराज आहेत, तसंच पीएलएला व्यावसायिक कामांमधून वेगळे करण्याच्या मोहिमेला विरोध करणारे) ते एकत्र आले तर शी यांच्या नेतृत्वाला मोठं आव्हान देणारं दल तयार करू शकतात,” असंही त्यांनी आपल्या लेखात लिहिलं आहे.
“या चकमकीबाबात चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांना किती सैनिक मारले गेल्याचं विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी आपल्याकडे माहिती नसल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी भारतीय माध्यमांचा हवाला दिला. यात चीनचे ४० सैनिक ठार झाल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु त्यांनी ती चुकीची माहिती असल्याचं दुसऱ्या दिवशी सांगितलं,” असंही ते म्हणाले. “एका आठवड्यानंतरही चीननं आपले किती सैनिक ठार झाले हे सांगितलं नाही. परंतु दुसरीकडे भारतानं शहीद झालेल्या जवानांची सार्वजनिकरित्या माहिती दिली आणि त्यांना सैन्याचा सन्मानही देण्यात आला. चीनच्या या वागण्याच्या पीएलएच्या अनेक माजी सैनिकांना राग आला आहे आणि त्यांचा राग दिवसेंदिवस वाढतच आहे,” असंही यांग यांनी लिहिलं आहे.

अधिक वाचा  वाढवण बंदर खडक रचनेमुळे परिसर मत्स्यबीज उत्पादनास अनुकूल विरोध पेटला, स्थानिक सर्वेक्षण मच्छिमारांनी रोखलं