मुंबई : महाराष्ट्रात विशेषतः मुंबई आणि महानगर क्षेत्रात येणाऱ्या इतर मोठ्या उपनगरांमध्ये चा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. प्रादुर्भाव वेगाने वाढण्याचं कारण समूह संसर्ग हे आहे का, यावर उलट सुटल चर्चा सुरू आहे. रायगडच्या पालकमंत्री आणि उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी काही भागात थोड्या प्रमाणावर कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरुवात झाल्याचं म्हटलं. पनवेल, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्याच्या अनेक मोठ्या शहरी भागांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. पण या कडक टाळेबंदीचा कम्युनिटी ट्रान्समिशनशी संबंध जोडू नका, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी PTI शी बोलताना समूह संसर्गाची शक्यता फेटाळून लावली. ‘राज्यात कम्युनिटी ट्रान्समिशन नाही’, असं टोपे म्हणाले आहेत. लॉकडाऊन उठल्यानंतर Unlock 1 मध्येच राज्यात मोठ्या वेगाने प्रसार झाला. ठाणे, पुणे या शहरांमध्ये दुपटीपेक्षा अधिक रुग्ण याच काळात वाढले. मुंबईतही सातत्याने कोरोनारुग्ण वाढत आहेत. विशेषतः मुंबईबाहेरच्या उपनगरांमध्ये या काळात कोरोनारुग्णांचं प्रमाण वाढलं. नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे, मीरा भाईंदर, पनवेल आदी उपनगरांमध्ये कोरोनारुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. याबाबत बोलताना रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, “हा समूह संसर्गाचा प्रकार असू शकतो. मुंबईच्या आसपासच्या परिसरात 15 ते 20 टक्के कम्युनिटी स्प्रेड आहे. सरकार त्यावर काम करत आहे. म्हणूनच मुंबई महानगर परिसरातल्या काही भागांत लॉकडाऊनचे निर्बंध कडक करण्यात आले आहेत.”
आदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्री आहेत. पनवेल आणि नवी मुंबईचा भाग त्यांच्या जिल्ह्यात येतो. हा भाग MMR म्हणजे मुंबई महानगराचा भाग येतो. MMR मधली मोठी उपनगरं सध्या कडक लॉकडाऊनमध्ये आहेत. पनवेलमध्येही कडक टाळेबंदी आहेत. पण कम्युनिटी स्प्रेडमुळे हे नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच असणाऱ्या आरोग्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. राजेश टोपेंनी कम्युनिटी ट्रान्समिशन असल्याचं अमान्य केलं आहे.

अधिक वाचा  काँग्रेस पक्षाला धक्का, माजी मंत्र्याचा पुत्र भाजपमध्ये दाखल होणार