भारताने ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याच्या निर्णयाचं संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांनी कौतुक केलं आहे. निक्की हेली यांनी ट्विट करत चीनच्या आक्रमकतेसमोर झुकणार नाही हे भारताने दाखवून दिलं आहे असं म्हणत भारताच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. केंद्र सरकारने टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अॅपसह एकूण ५९ अॅपवर बंदी घातली आहे. वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान खात्याने निवेदनाद्वारे स्पष्ट केलं आहे.
“चीनसाठी मोठी बाजारपेठ असणाऱ्या भारताने टिकटॉसह ५९ चिनी अॅपवर बंदी घातलेला निर्णय पाहून चांगलं वाटलं. भारत चीनला वारंवार तुमच्या आक्रमकतेसमोर झुकणार नाही हे दाखवून देत आहे,” असं निक्की हेली यांनी म्हटलं आहे. याआधी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनीही भारताच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. “चीनमधील कम्युनिस्ट पक्षासाठी सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या या अॅपवर भारतानं घातलेल्या बंदीचं आम्ही स्वागत करतो. भारताच्या दृष्टीकोनातून या निर्णामुळे सार्वभौमत्वाचं रक्षण होईल,” असं त्यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान म्हटलं.
५९ अॅपवर बंदी
केंद्र सरकारने टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अॅपसह एकूण ५९ अॅपवर बंदी घातली आहे. वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान खात्याने निवेदनाद्वारे स्पष्ट केले. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक या माहितीचा गैरवापर करीत असून त्याद्वारे देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत आहे. ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने बंदीचे आदेश जारी करताना म्हटले आहे. हे हानीकारक अॅप बंद करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानेही सूचना केली होती. तसेच नागरिकांतूनही या अॅपबाबत तक्रारी येत होत्या, असेही मंत्रालयाने या आदेशांत म्हटले आहे.