पुणे: पुणे शहर जिल्ह्यात गुरुवारी पुन्हा करोना रुग्णसंख्येचा उच्चांक पाहायला मिळाला. चाचण्यांची संख्या वाढल्याने शहरसह जिल्ह्यात १२६४ एवढ्या नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २५ हजारापर्यंत पोहोचली आहे. तर एका दिवसात ६३१ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून ३४४ गंभीर रुग्णांपैकी २८८ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.
पुणे शहरातील रुग्णांची संख्या आता १९ हजाराच्या पुढे गेली आहे. त्यामुळे पुण्यातील स्थिती अधिक चिंताजनक झाली आहे. पुण्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही रुग्ण वाढल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. पुणे शहरात एका दिवसात ६३१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण ११ हजार ६७१ रुग्ण बरे झाले होऊन घरी परतले आहेत. ३४४ रुग्ण अद्याप गंभीर असून ५६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. ६६९५ रुग्ण सद्या उपचाराखाली आहेत. दिवसभरात ४ हजार १४० एवढ्या चाचण्या झाल्या आहेत.
पुणे शहर जिल्ह्यात एकूण १८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी पुणे शहरात १५ तर नगरपालिका हद्द, पिंपरी आणि खडकी कँटोन्मेंट बोर्डात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ८११ झाली आहे. मृतांमध्ये बहुतांश रुग्णांना अन्य आजार होता.
आणखी अपडेट्स…
करोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने वडगाव बुद्रुक गावठाणचा संपूर्ण परिसर ४ ते ११ जुलै दरम्यान प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) जाहीर करण्यात आला आहे. सकाळी ७ ते दुपारी १ दरम्यान या भागात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. उर्वरित सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश महापालिका सहाय्यक आयुक्त संभाजी खोत यांनी दिले आहेत.
करोनाच्या संसर्गाच्या काळात खासगी रुग्णालयांकडून भरमसाठ बिल आकारले जात असल्याने गरिबांसाठी लागू केलेली महात्मा फुले आरोग्य जीवनदायी योजनेची मुदत ३१ जुलैपर्यंत आहे. त्याची मुदत वाढवून ती वर्षभर सुरुच ठेवावी, अशी मागणी आम आदमी पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.
राज्यात रिकव्हरी रेट वाढला
राज्याच्या आकडेवारीचा विचार केल्यास आज एकाच दिवशी ८०१८ इतक्या विक्रमी संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) वाढून ५४.२१ % एवढे झाले आहे. राज्यात आज राज्यात ६३३० नवीन रुग्णांचे निदान झाले असून १२५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. यापैकी ११० मृत्यू हे मागील ४८ तासांमधील तर बाकीचे १५ मृत्यू मागील कालावधीतील असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.३८ % एवढा असून तो कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.