स्मार्ट सिटीचे सीईओपद बळकावल्याचा आरोप करीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची केंद्र सरकारकडे तक्रार केली आहे. या आरोपांवर आता मुंढे यांनी मौन सोडले असून आरोपांचे खंडन केले आहे. आयुक्त मुंढे यांनी या संदर्भात एक पत्रक काढून त्याद्वारे आपली सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे.
आयुक्त मुंढे म्हणतात, “मी नागपूरमध्ये मनपा आयुक्त म्हणून २८ जानेवारी २०२० रोजी रुजू झालो. मनपा आयुक्त हे स्मार्ट सिटीचे पदसिध्द संचालक असतात. रामनाथ सोनावणे हे स्मार्टसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून कार्यरत होते. त्यांनी ११ फेब्रुवारी २०२० रोजी या पदाचा राजीनामा नागपूर स्मार्टसिटीचे चेअरमन प्रविणसिंह परदेशी यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर परदेशी यांनी मला स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा कार्यभार सांभाळण्याचे मोबाईलवर निर्देश दिले. त्यानुसार आणि शासन निर्णयानुसार आजपर्यंत मी या पदाचा कार्यभार सांभाळत आहे.”

अधिक वाचा  अंबादास दानवे यांना पक्षात घेण्यासाठी भाजप-शिंदे गटाकडून फोनवर फोन…; दानवेंची भूमिका काय?

“स्मार्टसिटीचा सीईओपदाचा कार्यभार सांभाळतांना मी दैनंदिन कामकाज पार पाडीत आहे. या कालावधीत ट्रान्सफर स्टेशनचे टेंडर रद्द करून बायो मायनिंगचे टेंडर जाहीर केले होते. याबाबत चेअरमन परदेशी यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात आला होता. तसेच हे जाहीर झालेले बायो मायनिंगचे टेंडर अजूनही अंतिम झालेले नाही. या दोन्ही बाबी संचालक मंडळाच्या प्रस्तावित बैठकीत ठेवण्यात येणार आहेत. तसेच कंपनीतील कर्मचाऱ्यांचे वार्षिक कामगिरी मूल्यांकनानुसार आढावा घेऊन काही कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात आले आहे, या बाबी देखील संचालक मंडळाच्या प्रस्तावित बैठकीत ठेवण्यात येणार आहेत,” असेही मुंढे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, “या काळात कार्यालयीन खर्च आणि वेतनाच्या देयकांशिवाय केवळ एकच चालू बील देण्यात आले आहे. हे बील यापूर्वीच मंजूर केलेल्या कामाचे आणि करार झालेल्या कंत्राटदराचे, त्यांनी केलेल्या कामाचेच आहे. यामध्ये कोणतीही आर्थिक अनियमितता झालेली नाही. त्यामुळे याबाबत मी सीईओ म्हणून काम करीत असताना कोणत्याही प्रकारची अनियमितता झालेली नाही. संचालक मंडळाची बैठक करोनाच्या परिस्थितीमुळे होऊ शकलेली नाही, ही बैठक प्रस्तावित आहे,” असा खुलासा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला आहे.
नागपूरकरांची दिशाभूल करु नका : महापौर
नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापौर संदीप जोशी यांनी केलेल्या आरोपांवर खुलासा करीत त्यांनी केलेल्या आरोपांचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, आयुक्त खोटे खुलासे करून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप महापौर संदीप जोशी यांनी केला आहे. त्यांनीही एका पत्रकाद्वारे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेला प्रत्येक खुलासा खोडून काढला आहे.