मुंबई: करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदाचा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाच्या या निर्णयावर राज्यभर चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘या निर्णयामुळं राज्याच्या करोनाविरुद्धच्या लढ्याला बळ मिळेल,’ असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
लालबागचा राजा मंडळाने आगामी गणेशोत्सवाबद्दल निर्णय जाहीर करणारं ट्विट केल्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कार्यालयानं या संदर्भात प्रतिक्रिया देणारं ट्विट केलं आहे. ‘लालबागचा राजा’च्या मंडळानं जनतेसमोर नेहमीच आदर्श ठेवला आहे. गणेशोत्सव साजरा न करता आरोग्य उत्सव साजरा करण्याच्या मंडळाच्या या निर्णयाने राज्याच्या करोनाविरुद्धच्या लढ्याला बळ मिळणार आहे,’ असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व धर्मीयांनी आपापले सण साधेपणाने व शक्यतो घरात राहूनच साजरे करावेत, असं आवाहन राज्य सरकारनं सुरुवातीलाच केलं होतं. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच राज्यातील गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींसोबत बैठकाही घेतल्या होत्या. या बैठकींमध्ये उत्सव नेमका कसा साजरा करायचा, मूर्तीची उंची किती असावी, सोशल डिस्टन्सिंगचे पालन कसे करावे, या संदर्भात चर्चा झाली होती व मंडळांना याबाबतचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार अनेक मंडळांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत करून उत्सवात बदल करण्याचे निर्णय घेतले होते.
लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या ‘लालबागचा राजा’च्या उत्सवाबद्दल सस्पेन्स कायम होता. तो आज संपला. मंडळानं यंदाचा उत्सवच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार नसल्याचं मंडळानं स्पष्ट केलं आहे.
असा होणार लालबागच्या राजाचा उत्सव
* गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होणार नाही. मात्र, भविष्यात तीच मूर्ती कायम राहणार
* ११ दिवस फक्त रक्तदान आणि प्लाझ्मा थेरपीसारखे उपक्रम राबवणार..
* करोनालढ्यात शहिद झालेल्या पोलिस पोलिसांच्या कुटुंबातील २० वीरमातांचा सन्मान
* गलवान खोऱ्यात शहिद झालेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपत्नींचा सन्मान
* मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाख रुपये देणार

अधिक वाचा  अरविंद केजरीवाल यांना आज दिलासा मिळेल? दिल्ली हायकोर्टात ईडीच्या अटकेविरोधात आज सुनावणी