रुग्णसंख्येच्या बाबतीत राज्यासाठी कालचा दिवस काहीसा दिलासादायक ठरल्यानंतर आज पुन्हा चिंता वाढवली आहे. एका दिवसात आढळून आलेल्या रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा वर गेला आहे. राज्यात पाच हजारांहून अधिक रुग्णांची नव्यानं भर पडली. त्यामुळे एकूण आकडा १ लाख ८० हजार २९८ इतका झाला आहे. तर दिवसभरात २ हजार २४३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिवसभरातील करोना आकडेवारीची माहिती दिली. टोपे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. “राज्यात आज ५ हजार ५३७ करोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. आज नवीन २ हजार २४३ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ९३ हजार १५४ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण ७९ हजार ७५ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत,” अशी माहिती टोपे यांनी दिली.
एक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा वाढ
राज्यात गेल्या काही दिवसांपासून संसर्गग्रस्त रुग्णांची आकडेवारी वाढली आहे. २७, २८, २९ जून रोजी राज्यात पाच हजारांहून अधिक संख्येनं करोना बाधित रुग्ण आढळून आले होते. काल (३० जून) त्यात घट झाल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे काहीसा दिलासा राज्याच्या आरोग्य विभागाला मिळाला होता. मात्र, आज (१ जुलै) रुग्णसंख्या पुन्हा पूर्वपदावर जाऊन पोहोचली आहे.

अधिक वाचा  प्रणिती शिंदे यांच्या प्रचार रॅलीत थेट शाहरुख खानची एण्ट्री? जाणून घ्या सत्य