पंढरपूर: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा करण्यासाठी आले असता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ही पूजा अर्धवट सोडावी लागली. अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने आदित्य यांना पूजा सुरू असताना बाहेर पडावे लागले. काही वेळाने बरे वाटल्यावर पुन्हा ते पूजेच्या ठिकाणी आले होते.
आज पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक विठ्ठलाची पूजा केली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे मंदिराच्या गाभ्यात महापूजेसाठी बसले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांना गुदमरल्यासारखे झाले आणि अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांनी पूजा अर्धवट सोडली आणि मंदिराबाहेर उभ्या असलेल्या त्यांच्या गाडीमध्ये जाऊन बसले.

अधिक वाचा  सरकार केवळ जातीय दंगली भडकावण्याचे काम करतय! 100 दिवसात आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार; यशोमती ठाकूर यांचा दावा 

आदित्य ठाकरे अचानक पूजा सोडून बाहेर आल्याने त्यांचे सुरक्षा रक्षकही चक्रावून गेले. त्यांच्या भोवती एकच गराडा पडला. पण त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याचं कळताच त्यांना पिण्यासाठी पाणी देण्यात आले. त्यानंतर अर्धातास गाडीत बसल्यावर त्यांना थोडं बरं वाटू लागलं. बरं वाटू लागल्यानंतर आदित्य पुन्हा मंदिराच्या गाभाऱ्यात गेले. विठ्ठल-रुक्मिनीचं दर्शन घेऊन मंदिर देवस्थानच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचा सत्कार सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचले. या कार्यक्रमात त्यांनी भागही घेतला. आता त्यांची प्रकृती चांगली असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक केली. यंदा मानाचे वारकरी म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या पाथर्डी येथील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांना मान मिळाला. आषाढी एकादशीपासून करोनाचे संकट नष्ट होऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी घातले. विठुमाऊलीसमोर इथे कुणी मुख्यमंत्री नाही, कुणी अधिकारी नाही, सर्वजण एकसारखे आहेत. विठ्ठल पूजेचा मान मला कधी मिळेल आणि अशा परिस्थितीत महापूजा होईल, याचा कधीही विचार केला नव्हता.

अधिक वाचा  अजित पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; MPSC च्या तीन रिक्त पदांवरील सदस्यांची नियुक्ती तातडीने करा

केवळ महाराष्ट्राच्या नव्हे, तर विश्वाच्यावतीने माऊलीचरणी साकडे घातले आहे. लवकरात लवकर नव्हे, तर आषाढी एकादशीपासून करोनाचे संकट नष्ट होवो. जगाला पुन्हा एकदा आनंदी, मोकळे आणि निरोगी जीवन जगण्याचे भाग्य प्राप्त होवो, अशी प्रार्थना उद्धव ठाकरे यांनी केली. पंढरपुरातील विकासकामे प्राधान्याने पूर्ण करू, असे आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.