गतवर्षी पाटणा येथे झालेल्या महिलांच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या पराभवाला कारणीभूत ठरल्यामुळे बंदी घालण्यात आलेल्या तीन खेळाडूंसह प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांवरील बंदी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने सोमवारी उठवली आहे.
टाळेबंदीमुळे ‘झूम’द्वारे झालेल्या राज्य संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत खेळाडूंच्या नोकऱ्या आणि भवितव्याच्या दृष्टीने बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी दिली. गतवर्षी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत साखळीतच गारद झालेल्या महाराष्ट्राच्या महिला संघाची राज्य कबड्डी संघटनेकडून चौकशी करण्यात आली. सर्व खेळाडूंची लेखी परीक्षासुद्धा घेण्यात आली होती.

अधिक वाचा  राजस्थान कोटामध्ये चाललंय काय? NEET मानसिक तणावात 3 महिन्यांत 8 विद्यार्थिनीने थेट जीवन संपवलं

त्यानंतर प्रशिक्षक श्रीराम भावसार आणि दीपिका जोसेफ यांच्यावर पाच वर्षांची, तर कर्णधार सायली केरिपाळे, स्नेहल शिंदे आणि व्यवस्थापिका मनीषा गावंड यांच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. कबड्डीमहर्षी शंकरराव ऊर्फ बुवा साळवी यांच्या जन्मदिनी १५ जुलैला कबड्डी दिनाचा होणारा वार्षिक कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आला आहे. मात्र जिल्हा संघटनांनी करोनाच्या पार्श्वभूमीवरील नियमांचे पालन करून साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन पाटील यांनी केले. राज्य कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष गजानन कीर्तिकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.