जेल किंवा कारागृह हे शब्द ऐकले की आपल्यापैकी कित्येक जणांच्या मनात थोडीशी का होईना भीती निर्माण होते. ज्याप्रमाणे जेलमध्ये अट्टल गुन्हेगारांसाठी खास पोलिसी खाक्या वापरला जातो, त्याप्रमाणे चांगलं वर्तन करणाऱ्या, सुधारण्याची इच्छा दाखवलेल्या कैद्यांसाठीही एक संधी दिली जाते. केरळमधील नेट्टुकालथेरी येथील Open Jail गेल्या काही वर्षांपासून आपलं वेगळेपण सिद्ध करत, चांगलं वर्तन असणाऱ्या कैद्यांकडून शेती आणि शेती पूरक व्यवसाय करवले जात आहेत. थिरुअनंतपुरमपासून अंदाजे ३५ किलोमिटर अंतरावर असलेल्या या Open Jail मध्ये अंदाजे ३९० कैदी आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे या जेलमध्ये असणारे सर्व कैदी शेती आणि जोडधंद्यामध्ये स्वतःला गुंतवून घेत वर्षाकाठी २ कोटींचं उत्पन्न घेतात.
नेट्टुकालथेरी येथील Open Jail ची जागा प्रशस्त आहे. या जागेत कैदी रबर, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ, शेळी पालन, पोल्ट्री फार्म असे अनेक जोडधंदे करतात. केरळमधील इतर कोणत्याही जेलच्या तुलनेत या जेलचं वार्षिक उत्पन्न हे सर्वाधिक आहे. १९६२ साली या जेलची स्थापना करण्यात आली होती. या जेलमध्ये लॉकअप ही संकल्पना राबवली जात नसून इथे डॉर्मेटरी पद्धत वापरली जाते. राज्यातील प्रत्येत जिल्ह्यातील कारागृहात चांगलं वर्तन असलेल्या कैद्यांची या जेलसाठी निवड केली जाते. या ओपन जेलची व्याप्तीही फार मोठी आहे. नेट्टुकालथेरी आणि थेवानकोड गावातील जमिनीवर कैदी उत्पादन घेतात. महत्वाची गोष्ट म्हणजे या जेलमध्ये शेतीसोबत ५० गाई, ५० बकऱ्या, २० म्हशी आणि पोल्ट्री फार्म आहे.
“या जेलमधील प्रत्येक कैद्याला आम्ही एका प्रकारे सवलत देतो, त्यांचा बहुतांश वेळ हा या शेतीच्या कामात जात असल्यामुळे त्यांचं मन रमून जातं, दुसरे कोणतेही विचार मनात येत नाहीत. शेतीच्या कामांमधून मिळणारं समाधानही काही वेगळंच असतं.” Open Jail चे Superintendent सॅम थंकायन यांनी ‘द बेटर इंडिया’ संकेतस्थळाशी बोलताना माहिती दिली. ओपन जेलमध्ये २० एकराच्या जागेत कैदी ऑर्गेनिक शेती करतात. ज्यामध्ये पालक, फ्लॉवर, कोबी, भेंडी, काकडी, स्ट्रॉबेरी अशा फळं आणि भाज्यांचा समावेश असतो. यातून मिळणारी फळं आणि भाज्या हे जेलमधील कैद्यांच्या जेवणासाठी वापरलं जातं, यानंतर उरलेला माल हा बाजारात विकला जातो. निव्वळ ऑर्गेनिक शेतीमधून मिळणाऱ्या उत्पादनातून या जेलला १० लाखांचं उत्पन्न मिळतं.
“ऑर्गेनिक शेतीसाठी आम्ही ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करतो. भाज्या आणि फळांसाठी बहुतांशवेळा नैसर्गिक खतं वापरली जातात. जेलच्या डेअरी फार्ममधील गाईंच्या शेणापासून तयार झालेलं खत इकडे वापरलं जातं. याव्यतिरीक्त जमिनीवर पडलेली पानं आणि पालापाचोळाही इथे वापरला जातो”, जेलचे चीफ वॉर्डन साजीकुमार यांनी माहिती दिली. याव्यतिरीक्त ओपन जेलमध्ये रबराचं उत्पादनही घेतलं जातं. जेलच्या उत्पन्नाच्या प्रमुख स्त्रोतांपैकी हा एक आहे. २०० एकरपेक्षा जास्त जागेत होत असलेल्या रबर उत्पादनामुळे जेलला १ कोटींचं उत्पन्न मिळतं. या कामासाठी जेलमधल्या ६० कैद्यांची निवड केली जाते, ते कैदी फक्त रबर उत्पादनाचं काम करतात. सकाळी कामाला सुरुवात झाल्यानंतर सर्व प्रक्रीया पार पाडून संध्याकाळी यांचं काम संपतं.
जेलमधील शेती व इतर उद्योगांसाठी येथे खास छोटं धरण बांधण्यात आलंय. यामध्ये मत्स्यपालनही केलं जातं. प्रत्येक कैद्याला दिवसाच्या कामाचे २३० रुपये मिळतात. ज्यावेळी या कैद्यांची शिक्षा संपते आणि त्यांची घरी जायची वेळ येते त्यावेळी हे पैसे त्यांना दिले जातात. प्रत्येत ७५ दिवसांनंतर कैद्यांना १५ दिवसांचा पॅरोलही दिला जातो. या जेलमध्ये कैद्यांची निवडही फार काळजीपूर्वक केली जाते. केरळ जेल विभागाचे Superintendent, पोलिस आणि वैद्यकीय विभागाचे प्रमुख अधिकाऱ्यांची समिती इतर जेलमध्ये ३ वर्षांचा कालावधी पूर्ण केलेल्या व चांगलं वर्तन असलेल्या कैद्यांची या जेलसाठी निवड करते. या जेलमधील कैद्यांना मोकळीक दिली जाते. फावल्या वेळेत हे कैदी आजुबाजूच्या परिसरात फेरफटका मारु शकतात. याव्यतिरिक्त २० हजार पुस्तकांनी परिपूर्ण अशी लायब्ररी देखील या जेलमध्ये आहे.
शेती व्यतिरीक्त ओपन जेलमध्ये सुतारकामही केलं जातं. १० ते १५ कैदी जेलमधील गरजेच्या वस्तू व आजुबाजूच्या शाळांसाठी लागणारं फर्निचर बनवतात. लॉकडाउन काळात या जेलमधील कैद्यांनी मास्क बनवत स्वस्त दरात याची विक्री केली होती. या जेलमध्ये काही कैदी गेल्या २० वर्षांपासून आहेत. काहींना आजन्म कारावासाची शिक्षा झाली आहे. पण इथे आल्यापासून आम्ही त्यांच्या वागण्यातला बदल अनुभवत आहोत. प्रत्येक कामात स्वतःला गुंतवून घेण्यापासून ते इतरांना मदत करण्यापर्यंत त्यांच्यात बदल घडताना दिसत आहे. त्यामुळे कैद्यांमध्ये सुधार घडवून आणण्यासाठी केरळच्या या Open Jail चा आदर्श इतर राज्यांनी घेण्यास हरकत नाही.

अधिक वाचा  माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीत ! अर्थमंत्री सीतारामन यांचे विधान चर्चेत