राज्यातील महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांमध्ये समन्वय असून आम्ही सर्वसामान्य नागरिक केंद्र बिंदू मानून, निर्णय घेत आहोत. आमच्या सरकारचे चांगल्या प्रकारे काम चालू असताना, विरोधक सतत टीका करत आहेत. मात्र त्यांनी एवढच लक्षात ठेवावे की, आमचं सरकार पाच वर्षे टिकणार आहे. असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आज पुण्यात बोलून दाखवलं.
देशभरात पेट्रोल व डिझेलची दरवाढ सातत्याने सुरू आहे. या विरोधात काँग्रेसने आज देशभर आक्रमक पवित्रा घेत आंदोलनास सुरूवात केली आहे. पुण्यात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. शहर अध्यक्ष माजी मंत्री रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर तसेच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची याप्रसंगी मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.
यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्यात करोना विषाणुचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यावर राज्य सरकार विशेष उपाय योजना करीत आहे. पण एवढ्या मोठ्या संकटात देखील विरोधक राजकारण करीत असल्याचे सांगून त्यांनी भाजपावर निशाणा साधला.
तसेच ते पुढे म्हणाले की, आपल्या सर्वांवर करोना विषाणुचे एवढे मोठे संकट असताना. प्रत्येक राज्य त्याला सामोरे जात आहे. मात्र त्याच दरम्यान केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढ करून सर्व सामन्याचे कंबरडे मोडत आहे. याच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन करीत असून, सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एकाच जागेवर पाच किंवा एखाद्या कार्यक्रमास ५० हून अधिक जण नसावे, असे नियम सरकारकडून करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील काँग्रेसच्या आंदोलनाला परवानगी देण्यात नव्हती असे सांगितले जात होते. मात्र याबाबत विश्रामबाग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा म्हणाले की, काँग्रेसकडून आंदोलनासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यानुसार त्यांना परवानगी देण्यात आली होती.

अधिक वाचा  गुजरात कॉलनीत ‘लहान करू होळी, दान करू पोळी’चा संदेश देत होळीचा सण उत्साहात साजरा