लडाख सीमेवर भारत आणि चीनदरम्यान तणावाचं वातावरण आहे. याचदरम्यान, रशियानं अत्याधुनिक एअर डिफेन्स मिसाइल सिस्टम S-400 भारताला लवकरच देण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान रशियाचे उपपंतप्रधान युरी इवानोव्हिक यांनी हे ब्रह्मास्त्र लवकरच भारताला देण्याचं आश्वासन दिलं आहे. यापूर्वी चीनचे सरकारी वृत्तपत्र पीपल्स डेलीनं भारताला शस्त्रास्त्र न पुरवण्याची विनंती रशियाला करण्यात आली होती.
भारत आणि रशियादरम्यान विशेष सहकार्य आहे. तसंच भारतासोबतचा करार लवकरच पूर्ण करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं असल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी बैठकीनंतर दिली. “रशियाच्या उपपंतप्रधानांशी माझी चर्चा झाली आहे आणि बैठकीतही सकारात्मक चर्चा झाली. करोनासारख्या संकटानंतरही द्विपक्षीय संबंध दृढच आहेत. जे करार करण्यात आले आहेत, ते कायम ठेवण्यात येतील. तसंच बऱ्याच बाबींमध्ये ही कामं लवकरच पूर्ण केली जातील,” असं सांगितलं असल्याची माहिती त्यांनी दिली. ‘हिंदुस्तान टाइम्स’नं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
यापूर्वी पीपल्स डेलीनं रशियानं भारताला शस्त्रास्त्रे देऊ नये अस मत व्यक्त केलं होतं. “तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या संवेदनशील काळात रशियाने भारताला शस्त्रास्त्रं देऊ नये. आशियातील हे दोन्ही शक्तीशाली देश रशियाचे जवळचे रणनितीक भागीदार आहेत” असे पीपल्स डेली या वर्तमानपत्रानं फेसबुकवरील ‘सोसायटी फॉर ओरियंटल स्टडीज ऑफ रशिया’ या ग्रुपवर लिहिलं होतं.

अधिक वाचा  अखेर राणा आणि अडसूळ यांचं मनोमिलन?; अजून आम्ही निर्णय नाही पण लवकरच… : अभिजित अडसुळ