मुंबई: करोना रुग्णसंख्येचा मुंबईतील उद्रेकाचा काळ संपलेला आहे आणि आकडे खाली येतील, असं मत राज्य सरकार नियुक्त टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केलं. गेल्या तीन आठवड्यांपासून नवीन रुग्ण, दुप्पट दर, बरे होण्याचा दर या सर्व निकषांमध्ये सकारात्मक घसरण झाली असल्याचं ते म्हणाले. मे महिन्याच्या तुलनेत परिस्थिती चांगली असल्याचं त्यांनी सांगितलं. पण पावसाळ्यामुळे या परिस्थितीला फटका बसू शकतो. पावसात प्रत्येक जणच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतो असं नाही आणि आपल्याकडे हवी तशी आरोग्य सुविधाही नाही. मुंबईतील काही भागात रुग्णसंख्येत वाढ अपेक्षित असल्याचंही त्यांनी मान्य केलं.
केंद्र सरकारच्या अंदाजानुसार मुंबईत मे महिन्याच्या अखेरपर्यंत ७५ हजार रुग्ण असणं अपेक्षित होतं. पण मे अखेर मुंबईत फक्त ३९ हजार ४४४ रुग्ण होते, तर २२ जून रोजी मुंबईतील रुग्णसंख्येचा आकडा ६७ हजार ६३५ एवढा होता. संजय ओक यांच्या मते, जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच दिवसाला ३ हजार केसेस अपेक्षित होत्या. पण सध्या एक हजारच्या आसपास केसेस येत आहेत. असं असलं तरी धोका अजून टळलेला नाही. अनलॉकिंग आणि पावसामुळे यात अजून वाढ होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने सावध रहावं, असं ते म्हणाले.
टास्क फोर्सच्या आकडेवारीनुसार, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात असलेला १३ टक्के दुप्पट दर आता जूनच्या पहिल्या आठवड्यात ३७ टक्के आहे. ३० टक्क्यांच्या वरील दर हा सुरक्षित मानला जातो आणि उद्रेकाचा काळ मागे गेला आहे, असं ओक म्हणाले. मुंबईत मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये नवीन रुग्ण सापडण्याचं प्रमाणही कमी झालं आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर वाढला आहे. सध्या बरे होण्याचा दर ५० टक्के आहे, जो आता ७० टक्क्यांवर नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं ओक म्हणाले. रेमडेसिविर आणि फेवीपिराविर यांसारख्या औषधांमुळे या महिनाअखेरपर्यंत हा दर ७० टक्क्यांवर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुंबईत सध्या सौम्य ते मध्यम लक्षणे असलेली रुग्ण जास्त असल्याचं सांगत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आवश्यक असल्याचंही टास्क फोर्सने सांगितलं. दुसरी लाट पाहायला मिळू शकतो. त्यामुळे अलर्ट राहणं गरजेचं आहे. ज्या भागात दुप्पटीचा दर ३० टक्क्यांखाली आहे, तिथे कंटेन्मेंट झोनप्रमाणे काळजी घेणं आवश्यक आहे, तर ४५ टक्क्यांपेक्षा जास्त दुप्पट दर असलेल्या भागांना खुलं केलं पाहिजे, असं डॉ. ओक म्हणाले.
या सर्व सकारात्मक आकडेवारीमुळे रुग्णालयांवरील ताण कमी झाला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्णालयांमध्ये आता खाली बेडही आहेत, असं डॉ. ओक म्हणाले. केईएम रुग्णालयातील दररोजच्या १२० रुग्ण प्रवेशाचं प्रमाण ३० वर आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉ. हेमंत देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, केईएममध्ये आता कोणतीही वेटिंग लिस्ट नाही. या रुग्णालयात मे महिन्यात एकाच दिवशी २० रुग्णांच्या मृत्यूचीही नोंद करण्यात आली होती. हा आकडा आता ३ वर आला आहे.