परिवर्तन या स्वयंसेवी संस्थेने राज्यातील खासदारांच्या २०१९-२० या वर्षातील संसदेतील कामाचे प्रगतिपुस्तक तयार केले असून, त्यात मुंबईतील सहा व एमएमआर तसेच कोकणातील पाच अशा ११ खासदारांच्या संसदीय कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे. अकरा खासदारांपैकी सर्वांत तरुण कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे आहेत. तसेच सर्वाधिक शैक्षणिक पात्रताही शिंदे यांचीच आहे. मात्र भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक हे संसदेत १०० टक्के उपस्थिती नोंदवून पहिल्या क्रमांकावर आहेत.

संसदेतील उपस्थितीची राष्ट्रीय सरासरी ७७.४७ टक्के आहे. तर सर्वांत कमी उपस्थिती अरविंद सावंत यांची ६३.७५ टक्के आहे. संसदेत विचारलेल्या प्रश्नांची राष्ट्रीय सरासरी ४४.४६ टक्के आहे. यात शिवसेनेचे खासदार सर्वांत पुढे असून, गजानन किर्तिकर यांनी १९५ प्रश्न विचारून पहिला क्रमांक पटकावला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीचे सुनील तटकरे असून, त्यांनी १८८ प्रश्न विचारले आहेत. ठाण्याचे श्रीकांत शिंदे तिसऱ्या क्रमांकावर असून, त्यांनी १६४ प्रश्न विचारले आहेत. संसदेतील विविध चर्चांमध्ये सहभागी होण्याची राष्ट्रीय सरासरी १५.५६ टक्के आहे. यात शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी ५३ चर्चांमध्ये सहभागी होऊन पहिला क्रमांक पटकावला आहे. दुसऱ्या क्रमांकावर श्रीकांत शिंदे असून, त्यांनी ४९ चर्चांमध्ये तर, विनायक राऊत यांचा ४६ चर्चांमध्ये सहभाग आहे.

अधिक वाचा  गैरविश्वास दाखवला तर ‘हे’ लक्षात ठेवा, पक्षप्रवेशाच्याच दिवशी मोहिते पाटलांचा आढळरावांना मोठा इशारा

व्यक्तिगत विधेयकांची राष्ट्रीय सरासरी ०.२५ आहे. यात भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी नऊ विधेयके मांडून पहिला क्रमांक पटकावला आहे. श्रीकांत शिंदे यांनी पाच विधेयके मांडून दुसरा क्रमांक तर राहुल शेवाळे यांनी ४ विधेयके मांडली आहेत. मुख्य म्हणजे उर्वरित आठ जणांनी २०१९-२० या वर्षात एकही विधेयक मांडलेले नाही.

चर्चा – राहुल शेवाळे (५३), श्रीकांत शिंदे (४९)
उपस्थिती – गोपाळ शेट्टी, मनोज कोटक (१०० टक्के)
प्रश्न – गजानन किर्तिकर (१९५), सुनील तटकरे (१८८)
संसदीय आयुधांच्या वापरावरून मूल्यमापन
खासदार आपल्या संसदीय आयुधांचा कसा वापर करतात, यावरून परिवर्तन संस्थेने मुंबईतील सहा व एमएमआर तसेच कोकणातील पाच अशा ११ खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेतला आहे.
खासदारांचे काम म्हणजे कायदे तयार करणे व सरकारच्या कारभारावर अंकुश ठेवणे असल्याने, ते त्यांना दिलेल्या आयुधांचा कसा वापर करतात यावरून प्रगतिपुस्तक तयार केल्याचे ‘परिवर्तन’च्या अध्यक्ष अंकिता अभ्यंकर यांनी म्हटले आहे. माहिती संकलनात ‘परिवर्तन’कडून कोणतीही चूक राहणार नाही, याची पुरेशी काळजी आम्ही घेतली आहे. मात्र तरीही, एखादी माहिती चुकली आहे, असे निदर्शनास आल्यास ते आमच्यापर्यंत पोहोचवावे. योग्य ती खातरजमा करून दुरुस्ती केली जाईल, असेही याबाबत संस्थेने म्हटले आहे.
कामगिरीसाठीचे निकष
– लोकसभेतील प्रत्येक खासदाराची उपस्थिती
– प्रश्न विचारून, सरकारकडून माहिती घेणे, सरकारला जाब विचारणे.
– कायदे, लोकहिताचे प्रश्न याबद्दलच्या चर्चांमध्ये खासदारांचा सहभाग.
– लोकसभेत खासदार या नात्याने स्वतंत्रपणे कायदे मांडणे