मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी आता ३६ दिवसांवर पोहोचला असून वरळी, धारावी, देवनार, गोवंडी, बैंगनवाडी यासारख्या हॉटस्पॉटमधील स्थिती नियंत्रणात आली आहे. रुग्णशय्या, रुग्णवाहिका, डॉक्टर्स, कोरोना उपचार केंद्र या सर्व सुविधांमध्ये कित्येक पटीने वाढ झाली आहे. याच वेगाने आपण सर्व मिळून कोरोना विरुद्ध लढत राहिलो तर जुलै मध्यापर्यंत कोविड संसर्गाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली असेल, त्याच दिशेने महानगरपालिका प्रशासनाचा प्रयत्न सुरु आहे, अशी आशा पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईच्या काही भागांमध्ये रुग्ण वेगाने वाढत आहेत. त्या विभागांमध्ये शीघ्रकृती कार्यक्रम राबविण्याचे महानगरपालिकेने निष्टिद्धr(१५५)त केले आहे. ‘मिशन झिरो ’ अर्थात ‘शून्य करोना रुग्ण’ लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या उपक्रमाची सुरूवात अंधेरी येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलातून सोमवारी झाला. त्यावेळी आयुक्तांनी जुलै मध्यापर्यंत परिस्थिती आटोक्यात आणण्याचे लक्ष्य असल्याचे सांगितले.
मे महिन्यातील ३,७०० रुग्णशय्यांच्या तुलनेत आज रुग्णालयांमध्ये १२ हजार खाटा उपलब्ध आहेत. जूनअखेपर्यंत १५ हजार तर जुलै अखेपर्यंत २० हजार रुग्ण शय्या उपलब्ध असतील, असे आयुक्तांनी नमूद केले. खाटांची संख्या वाढवताना डॉक्टर्सची संख्याही वाढवली. निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात पाचपट वाढ करतानाच महाराष्ट्रातील ज्या भागांमध्ये संसर्ग कमी आहे अशा भागातून डॉक्टरांना मुंबईत आणले. मे महिन्यातील १०० च्या तुलनेत रुग्णवाहिकांची संख्या आता ७०० पर्यंत पोहोचली आहे, असेही त्यांनी सांगितले.
टाळेबंदी सैल केल्यावर संसर्ग वाढण्याची भीती होती. मात्र सुदैवाने ३ जून ते २२ जून २०२० म्हणजे मागील १९ दिवसात कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणातच आहे. एका बाजूला मुंबईतील स्थिती नियंत्रणात येत असताना दहिसर, बोरिवली, मालाड, कांदिवली, मुलुंड, भांडूप अशा विशिष्ट ६ ते ७ विभागांमधून अद्यापही मुंबईच्या एकूण रुग्णसंख्येच्या निम्मे रुग्ण आढळत आहेत. त्यासाठी फिरते दवाखाने अर्थात मोबाईल डिस्पेंसरी व्हॅनच्या माध्यमातून या विभागांच्या सर्व परिसरांमध्ये पोहोचून तपासणी वाढवण्यात येईल. संशयित रुग्णांची जागेवरच टेस्ट अर्थात चाचणी केली जाईल. यातून बाधितांचा वेळीच शोध घेऊन त्यांना वेगळे केल्यास विषाणूची साखळी तोडण्यास मदत होणार आहे, असे ते यावेळी म्हणाले.

अधिक वाचा  राष्ट्रवादीनं साताऱ्यावरील आग्रह सोडला? “सातारा सोडतो पण त्या बदल्यात…”