अमरावती : कोरोनाचं संकट असतानाच आता अंद्धश्रद्धेचा विळखाही अधिक घट्ट होत आहे हे सांगणार अघोरी प्रकार समोर आला आहे. मेळघाटातील आदिवसी पाड्यावर आजही अंधश्रद्धेला बळी पडत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. पोटाचा आजार बरा करण्यासाठी 26 दिवसांच्या नवजात शिशुला चटके दिल्याची 24 तासांत दुसरी घटना समोर आली आहे. याआधी 8 महिन्यांच्या बाळासोबत हा प्रकार घडला होता.
धक्कादायक बाब म्हणजे बारुगव्हाण या गावातील 26 दिवसाच्या चिमुकलीला पोट फुगल्यानं गरम सळीने चटके देण्याचा अघोरी प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. जखमी असलेल्या या चिमुकलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोटफुगी सारख्या आजारांवर पोटाला गरम चटके देणं हा संतापजनक प्रकार शासनाने मोडीत काढावा अशी भावना सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना लागली आहे. तर अश्या अघोरी प्रथा चालविणाऱ्या बुवा बाजी करणाऱ्या मांत्रिकावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.
अमरावती जिल्हयातील चिखलदरा तालुक्यातील बोरधा या गावामध्ये जाणू सज्जू तोटा हिच्या 8 महिन्यांच्या बाळाला पोटफुगी झाल्यानंतर त्याला आई-वडिलांनी भुमकाकडे (भगत बुवा) नेलं होतं. भुमकानं चिमुरड्याच्या संपूर्ण पोटावर गरम विळ्याने चटके दिले. या प्रकाराला डंबा असं संबोधलं जातं. भरारी पथकाला याची महिती मिळताच 8 महिन्यंच्या श्यामला वैद्यकीय उपचारार्थ हलविले तर आई वडिलांना विचारणा केली असता हा प्रकार समोर आला.
तर दुसरीकडे याच बुवा बाजीमुळे एका गर्भवती महिलेला देखील आपल्या प्राणाला मुकावे लागलं आहे. मेळघाटमध्ये कुपोषणाची मुख्य समस्या असताना येथील आदिवासी अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर काढण्यास प्रशासन अजुन यशस्वी झालेलं नाही, अशी माहिती अंनिसचे हरीष केदार यांनी सांगितलं आहे.

अधिक वाचा  कोथरूड थोरात उद्यान्यामधील मोनोरेल प्रकल्प नागरिकांच्या इच्छेविरुद्ध होणार नाही: मनपा आयुक्त