भारत-चीन सीमेवर प्रचंड मोठा तणाव असताना आज नेपाळच्या वरिष्ठ सभागृहात नव्या नकाशाला मंजुरी देण्यासंदर्भातील विधेयक एकमताने मंजूर झाले. त्याआधी काल नेपाळचे लष्कर प्रमुख जनरल पूर्ण चंद्र थापा यांनी कालापानी जवळ चांग्रु येथे उभारण्यात आलेल्या चौकीची पाहणी केली. नेपाळने उत्तराखंडमधील कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख या भारतीय प्रदेशांवर दावा केला आहे. त्यासाठी नेपाळने आपल्या नकाशामध्ये सुद्धा दुरुस्ती केली आहे. नेपाळचा सध्या भारताबरोबर सीमावाद सुरु आहे.
या पाहणी दौऱ्याच्यावेळी सशस्त्र पोलीस दलाचे शैलेंद्र खानाल जनरल थापा यांच्यासोबत होते. नेपाळ सीमेची जबाबदारी सशस्त्र पोलीस दलाकडे आहे. मानसरोवर यात्रेसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आठ मे रोजी धाराचुला-लिपूलेख मार्गाचे उद्घाटन केले. त्यानंतर नेपाळ सशस्त्र पोलीस दलाची चौकी चांग्रु येथे बांधण्यात आली.
नेपाळने अचानक इतक्या वर्षांनी भारतीय प्रदेशांवर दावा केला आहे. मागच्या महिन्यात लष्कर प्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी नेपाळ कोणाच्यातरी सांगण्यावरुन असे वागत असल्याचे म्हटले होते. त्यांचा इशारा चीनकडे होता. मागच्या आठवडयात नेपाळच्या प्रतिनिधी सभागृहाने नव्या नकाशाला मंजुरी देणारे विधेयक मंजूर केले आहे. आता राष्ट्रीय सभेमध्ये हे विधेयक आज मंजूर झाले.
राजनाथ सिंह काय म्हणाले?
लिपूलेख पासपर्यंत बांधण्यात आलेला रस्ता भारताच्या हद्दीमध्येच आहे असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी स्पष्ट केले आहे. नेपाळबरोबरच्या संबंधांमध्ये निर्माण झालेले गैरसमज चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यात येतील असे त्यांनी सांगितले. “भारत-नेपाळमध्ये फार पूर्वीपासून अत्यंत घनिष्ठ मैत्रीचे संबंध आहेत. जगातील कुठल्याही शक्तीमुळे भारत-नेपाळ संबंध तुटणार नाहीत” असे राजनाथ सिंह म्हणाले. ते उत्तराखंडमधील एका व्हर्च्युअल सभेला संबोधित करत होते.

अधिक वाचा  ‘बडे मिया छोटे मिया’ च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान अक्षयनं टायगरला दिला ‘हा’ सल्ला, ऐकताच सगळ्यांना हसू अनावर