मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडं सोपवावा, अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी राज्य सरकारकडं केली आहे. ‘सुशांतच्या कुटुंबालाच महाराष्ट्र पोलिसांकडून तपास नको असेल तर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात सरकारला काय अडचण आहे,’ असा सवालही राम कदम यांनी केला आहे. (Sushantsingh Suicide Case Probe)
बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असलेल्या सुशांतसिंह यानं रविवारी दुपारी मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या या आत्महत्येनं केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे तर देशही हळहळला. कुटुंबीयांच्या उपस्थितीत काल त्याच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, त्याच्या आत्महत्येच्या कारणांवरून सुरू झालेली चर्चा थांबताना दिसत नाही. सुशांतसिंह राजपूत याला आत्महत्येला भाग पाडण्यात आलं आहे, असं काहींचं म्हणणं आहे. तर, तो सिनेसृष्टीतील राजकारणाचा बळी ठरला आहे. त्याचा खून झाला आहे, असा आरोप काहींनी केला आहे. त्यामुळं त्याच्या आत्महत्येचं गूढ वाढलं आहे.
ही सगळी चर्चा सुरू असतानाच ‘आमचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही’ असं वक्तव्य सुशांतच्या कुटुंबीयांनी केलं होतं. याचाच आधार घेत भाजपचे आमदार राम कदम यांनी लगेचच सुशांतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडं देण्याची मागणी केली आहे. ‘सुशांतच्या आत्महत्येच्या प्रकरणात अनेक नावं पुढं येत आहेत. देशभर चर्चा सुरू आहे. अनेक शहरांशी या प्रकरणाचा संबंध असू शकतो. शिवाय, महाराष्ट्र पोलिसावर व महाविकास आघाडी सरकारवर आमचा विश्वास नाही असं त्याचं कुटुंबच म्हणत असेल तर मग या प्रकरणाचा तपास सीबीआयकडं द्यायला काय हरकत आहे. महाराष्ट्र सरकारनं याबाबत निर्णय घ्यायला हवा,’ असं राम कदम यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्य सरकारनंही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. ‘सुशांतच्या शवविच्छेदन अहवालातून त्यानं आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. मात्र, मीडियाच्या माध्यमातून या प्रकरणाचा वेगळा पैलू समोर येतोय. सिनेसृष्टीतील व्यावसायिक शत्रुत्वातून त्यानं आत्महत्या केल्याचं बोललं जातंय. त्या अनुषंगानंही पोलीस या प्रकरणाचा तपास करतील,’ असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

अधिक वाचा  महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेत मोठा ट्वीस्ट, शिंदे गट-भाजपमध्ये गृहमंत्रिपद विभागले जाणार?