भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग हा काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. IPL मध्ये हरभजन सिंगने प्रत्येक वर्षी दमदार कामगिरी केली असूनही त्याला आंतरराष्ट्रीय संघात मात्र स्थान मिळवणे शक्य झाले नाही. हरभजनचा सहकारी आणि डावखुरा फलंदाज युवराज सिंग याने गेल्या वर्षी निवृत्ती स्वीकारली. त्याला निरोपाचा सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. BCCI कडून मी कोणत्याही निरोपाची अपेक्षा ठेवली नव्हती, असेही युवराजने स्पष्ट केले होते. याच मुद्द्यावर बोलताना, टीम इंडियातील अनेक खेळाडूंना निरोपाचा सामना खेळायला मिळायला हवा होता, पण त्यांच्यावर अन्याय झाला, अशा आशयाचे मत हरभजनने व्यक्त केले आहे.
“मी खेळलेल्या शेवटच्या एकदिवसीय मालिकेत मी सहा बळी टिपले होते. आम्ही ती मालिका हरलो, त्यानंतर मला पुन्हा टीम इंडियातून खेळायची संधी मिळाली नाही. माझं नशीब मला साथ देत नव्हतं, हे त्यामागचे कारण असू शकते. पण विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि व्ही व्ही एस लक्ष्मण या साऱ्यांना निरोपाचा सामना मिळायला हवा होता. जर आपणच आपल्या खेळाडूंचा आदर करत नसू, तर क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर बाहेर त्यांचा कोणीही आदर करणार नाही. माझ्याबाबतीत जे झालं, ते इतर कोणाच्याही बाबतीत होऊ नये, असं मला वाटतं”, असं स्पष्ट मत समालोचक आकाश चोप्राच्या यु ट्यूब चॅनेलवर हरभजनने व्यक्त केलं.
हरभजनने याच शो मध्ये त्याचा संघातील निवडीचा किस्सा सांगितला. नेट्समध्ये सराव सत्रादरम्यान हरभजनला संधी मिळाली आणि त्याने संधीचं सोनं केलं होतं. हरभजन म्हणाला, “गोलंदाजीतील ‘दुसरा’ या चेंडूमुळे खरं तर मला संघात संधी मिळाली. मोहालीच्या मैदानावर कसोटी सामन्यातील एका दिवशी नेट्समध्ये सराव सुरू होता. सराव सत्र जवळपास संपत आलं होतं. तेव्हा मला अचानक कर्णधार अझरूद्दीनने गोलंदाजी करायला सांगितली.
“मी गोलंदाजीसाठी गेलो तेव्हा सचिन, अझर साऱ्यांचा फलंदाजीचा सराव संपलेला होता. अझरूद्दीने जेवत होता. सचिन माझ्या बाजूच्या नेट्समध्ये गोलंदाजी करत होता. आणि माझ्यासमोर वेगवान गोलंदाज देबाशिष मोहन्ती फलंदाज म्हणून उभा होता. मी त्याला सात-आठ चेंडू टाकले, त्यातल्या चार-पाच चेंडूंवर तो बाद झाला. तो मोहन्ती (गोलंदाज) होता, सचिन नव्हता; त्यामुळे त्याला बाद करणं फार कठीण नव्हतं. पण माझी गोलंदाजी पाहून अजय जाडेजाने अझरूद्दीनला त्या कामगिरीबद्दल सांगितलं. सचिननेही मला तिथेच शुभेच्छा देत खेळावर पूर्ण लक्ष ठेव असं सांगितलं. आणि त्यानंतर वर्षभरातच मी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले”, असा किस्सा हरभजनने सांगितला.

अधिक वाचा  विजय शिवतारेंनी पुन्हा बैठक बोलावली, मोठी घोषणा करण्याची शक्यता?