मुंबई: नागपूर आणि पुणे जिल्ह्यात झालेल्या दोन दलित तरुणांच्या हत्यांनी राज्यात खळबळ उडाली असून या घटनांवर राज्यातील मान्यवर व्यक्तींनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या दोन्ही निर्घृण हत्यांना जबाबदार असलेल्या गुन्हेगारांना कायद्यानुसार कठोर शासन झाले पाहिजे, अशी मागणी या विचारवंतांनी राज्य सरकारकडे एका जाहीर निवेदनाद्वारे केली आहे.
नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात अरविंद बनसोड या बौद्ध युवकाची राजकीय-जातीय वैमनस्यातून हत्या करण्यात आली. त्याचप्रमाणे, पुण्याच्या पिंपरी चिंचवड भागातील पिंपळे-सौदागर गावातील विराज जगताप या २० वर्षे वयाच्या बौद्ध युवकाची मराठा मुलीवरील प्रेम प्रकरणातून निर्घृण हत्या करण्यात आली. गेल्या चार-पाच दिवसांत घडलेल्या या दोन्ही घटना अमानुष, माणुसकीला कलंक लावणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीशील समजल्या गेलेल्या परंपरेला काळिमा फासणाऱ्या असल्याचे नमूद करत मान्यवर विचारवंतांनी या घटनांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
सोशल मीडियावरील दोन्ही समाजाच्या प्रतिक्रिया अत्यंत प्रक्षुब्ध व स्फोटक असल्याचे दिसून येते. त्या अधिक प्रक्षुब्ध करून राज्यात फार मोठ्या प्रमाणावर सामाजिक-राजकिय अस्थिरता निर्माण करण्याचा काही समाज विरोधक हितसंबंधी शक्ती प्रयत्न करीत आहेत. त्यांना कोणत्याही परिस्थितीत यश येणार नाही आणि राज्यात अस्थिरता निर्माण होणार नाही, हे पाहणे आवश्यक आहे. याची जबाबदारी दलितांवर असली, तरी बहुसंख्याक असलेल्या मराठा समाजावर ती अधिक मोठी आहे. दोन्ही समाजांत कष्टकरी वर्ग प्रचंड संख्येने आहे. दलित समाजाने ‘जशास तसे’ उत्तर देण्याच्या भूमिकेत असणे हितावह नाही, तसेच मराठा समाजाने भ्रामक सामाजिक प्रतिष्ठा जोपासणेही तितकेच अयोग्य आहे. सामाजिक अभिसरण व विचारांची देवाणघेवाण यातूनच सामाजिक प्रगती व स्थैर्य साध्य होते, असा आमचा दृढ विश्वास आहे, असे नमूद करत विचारवंतांनी दोन्ही समाजांना समंजसपणा दाखवण्याचे आवाहन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समतावादी विचारांचा फार मोठा वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे. महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांनी सामाजिक सुधारणांसाठी केलेल्या अथक प्रयत्नांचा परिणाम म्हणून गेल्या काही वर्षांत दोन्ही समाजात एक मोठा प्रगतीशील वर्ग निर्माण झाला आहे. त्यामुळे सामाजिक अभिसरण व विचारांची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी सतत प्रयत्न करणे, ही या प्रगतीशील वर्गाची फार मोठी जबाबदारी आहे आणि त्यांनी ती पार पाडलीच पाहिजे. त्याचप्रमाणे, अशा गंभीर सामाजिक दृष्ट्या संवेदनशील घटनांबाबत सोशल मीडियातून व्यक्त होताना प्रत्येकाने अतिशय जबाबदारीचे भान ठेवणे अपेक्षित आहे, असे परखड मतही या विचारवंतांनी मांडले आहे.
माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत, भालचंद्र मुणगेकर, एन. डी. पाटील, बाबा आढाव, प्रेमानंद गझवी, जयसिंगराव पवार, प्रताप आसबे, प्रवीण गायकवाड, प्रज्ञा दया पवार, श्रीमंत कोकाटे, जयंत पवार, मधु कांबळे, सुभाष लोमटे, मधु मोहिते या मान्यवरांनी हे निवेदन प्रसिद्धीला दिले आहे.

अधिक वाचा  अनुराग कश्यपला 15 मिनिटांसाठी भेटायचं असेल तर द्यावे लागतील इतके रुपये; शेअर केली पोस्ट