पुणे : हॉटेल व्यावसायिकावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना नऱ्हे येथे शुक्रवारी सव्वासहाच्या सुमारास घडली. यामुळे नऱ्हे परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
सुनील बारकू लांगोरे (वय ३५, रा. नऱ्हे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांगोरे हे नऱ्हे परिसरात राहतात. त्यांच्या राहत्या इमारतीशेजारीच त्यांचे छोटे स्नॅक्स सेंटर आहे. लॉकडाउनमुळे त्यांचे कामगार गावाकडे गेले असल्याने मागील काही दिवस ते एकटेच हॉटेल उघडत होते. चहा आणि नाष्टा असा ठरावीक मेन्यू ते पार्सल देत होते.
शुक्रवारीही त्यांनी नेहमीप्रमाणे हॉटेल उघडले. हॉटेलमध्ये आलेल्या काही व्यक्तींशी त्यांची बाचाबाची झाल्यावर संबंधित व्यक्तींनी धारदार शस्त्राने त्यांच्या चेहऱ्यावर सपासप वार केले. यामध्ये रक्ताच्या थारोळ्यात ते जागीच पडले. यानंतर आरोपी तेथून पसार झाले. आजूबाजूच्या नागरिकांनी सिंहगड पोलिसांना ही माहिती दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार शेळके व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला. पंचनामा करून तपासासाठी पथके रवाना करण्यात आली.
जळगावात भरदिवसा हॉटेल मालकाचा खून
जळगाव: दारू पिताना झालेल्या वादात दोन तरुणांनी बिअरच्या फुटलेल्या बाटलीने मानेवर वार करीत हॉटेल मालकाचा खून केला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शहरातील नेरीनाका स्मशानभूमीजवळ असलेल्या आसोदा मटण हॉटेलमध्ये घडली. प्रदीप ज्ञानदेव चिरमाडे (वय ५०, रा. आसोदा ता. जळगाव) असे मृत हॉटेल मालकाचे नाव आहे. यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेत अन्य दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. नंतर जखमी अवस्थेत प्रदीप चिरमाडे यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मयत प्रदीप चिरमाडे यांचा मुलगा गिरीश याने हल्लेखोरांना पाहिले असून, त्यातील एकाची ओळख देखील पटली असल्याचे कळते.

अधिक वाचा  ‘मी तसं बोललो नव्हतो’, शरद पवार यांचा घुमजाव, ‘मूळ पवार आणि बाहेरचे पवार’ वक्तव्यावर स्पष्टीकरण