मुंबई: ‘संकटाचे रूपांतर संधीत करण्याची हीच ‘योग्य’ वेळ असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे. हे संकट म्हणजे करोना व संधी म्हणजे स्वावलंबन असे आम्हाला वाटत होते. पण पंतप्रधानांच्या सांगण्याचा खरा अर्थ भाजपातील नेत्यांनी समजून घेतला आहे व करोनाचे संकट हीच संधी मानून राजस्थानमधील स्थिर सरकारचे पाय ओढायला सुरुवात केली आहे,’ अशी जळजळीत टीका शिवसेनेनं केली आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांना गळाला लावून मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार पाडल्यानंतर भाजपनं आपला मोर्चा राजस्थानकडं वळवला आहे. राजस्थानात भाजपचं सरकार आणण्यासाठी ‘ऑपरेशन लोटस’ सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. काँग्रेस आणि सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांना विकत घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांची लालूच दाखविण्यात आल्याचा आरोप स्वत: मुख्यमंत्री अशोक गेहलोत करीत आहेत. तशी तक्रार काँग्रेसने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर घणाघाती टीका केली आहे.

अधिक वाचा  लोकशाहीच्या युद्धात घराघरांत रणधुमाळी; भाऊ-बहिण, नणंद-भावजयीत जुंपली

‘देशात सध्या करोनाचे संकट मानवी जीवनाचा घास गिळत असताना दिल्लीतील राज्यकर्त्या पक्षाला विरोधकांची सरकारे पाडण्याची थेरं सुचावीत हे धक्कादायक आहे. विरोधी पक्षाची सरकारे दोन-चार राज्यांत राहिली तर देशावर असे काय आभाळ कोसळणार आहे? ही सरकारे लोकशाही मार्गाने निवडून आली आहेत. भले सरकार बनविण्यासाठी त्यांनीही आपल्या पद्धतीने जमवाजमव केली असेल, मग हीच जमवाजमव भाजपने हरयाणा, मणिपूर, गोव्यात आणि कर्नाटकातही केलीच व मध्य प्रदेशातही राजकीय चिखल करूनच त्यात सत्तेचे कमळ फुलवले. राज्य सरकारे करोना संकटाशी लढा देत असताना त्या विपरीत परिस्थितीचा गैरफायदा घेत विरोधी सरकारचे नटबोल्ट उखडायचे हे प्रकार अघोरी आहेत,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
‘देशात एकाच दिवशी १० हजार करोना रुग्ण वाढले आहेत यावर केंद्रीय सरकार चिंता करायला तयार नाही. अनेक राज्यांत संकटकाळी केंद्राची मदत पोहोचू शकलेली नाही. महाराष्ट्रात तुफानी वादळाने कोकण किनारपट्टीवर लोकांचे अतोनात नुकसान झाले. या संकटात केंद्रीय मदतीचा हात अद्यापि पोहोचलेला दिसत नाही, पण विरोधकांची सरकारे पाडण्यासाठी मात्र निधी व पथके पोहोचत आहेत. संकटाचे रूपांतर संधीत करण्याची हीच ‘योग्य’ वेळ असल्याचे मत पंतप्रधान मोदी यांनी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमात सांगितले. त्यांच्या भक्तांनी ‘मोदी उवाच’चा अनर्थ केला. मोदी यांनी या संधीसाधूंची एकदा शाळा घ्यावी,’ असा सल्लाही शिवसेनेनं दिला आहे.
महाराष्ट्रात प्रयोग कोसळला!
‘कमलनाथ सरकार पाडण्याचा आदेश आम्हाला वरून आला. त्यामुळे मध्य प्रदेशातील सरकार पाडले, असा स्फोट आता मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी करावा यातच सर्व आले. वरच्यांनी खाली सांगितले व खालच्यांनी वरच्यांच्या मदतीने संकटातील संधीचे ‘सोने’ केले. महाराष्ट्रातही असे राजकीय संकट निर्माण करून राज्य स्थापन करण्याचा प्रयोग सहा महिन्यांपूर्वी झाला, पण संधीचा तो प्रयोग कोसळला,’ असा टोलाही सेनेनं हाणला आहे.