मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गेले दोन दिवस कोकण दौऱ्यावर होते. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्ग वादळग्रस्तांची भेट घेऊन त्यांनी तेथील स्थितीचा आढावा घेतला. या भेटीनंतर मुंबईत परतताच आज त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन कोकणातील सत्यस्थिती मुख्यमंत्र्यांपुढे मांडली. दादर येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकात ही भेट झाली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर अन्य बैठकांच्या निमित्ताने होणाऱ्या भेटीगाठी वगळता स्वतंत्रपणे फडणवीस व मुख्यमंत्र्यांची ही तशी पहिलीच भेट होती. अवघ्या काही मिनिटांच्या या भेटीत फडणवीस यांनी वादळग्रस्तांबाबत मागण्यांचे निवेदनही मुख्यमंत्र्यांना दिले.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोकण दौऱ्यात जे सत्य माझ्यासमोर आलं, ते मी मुख्यमंत्र्यांसमोर मांडलं, एक रुपयाचीही मदत तिथे अद्याप मिळालेली नाही. सरकारचं अस्तित्व कुठेच दिसत नाही, लोकांना शाळांमध्ये कोंबून ठेवलं आहे. हे तेथील विदारक चित्र मांडतानाच वादळग्रस्तांना रोख स्वरूपात तात्काळ मदत मिळायला हवी अशी मागणी केल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
कोकणात पत्र्यांचा काळा बाजार सुरू आहे. कोळी बांधवांच्या बोटींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. लॉकडाऊन आणि वादळामुळे मच्छिमार बांधव आर्थिक गर्तेत सापडला आहे. त्याला एकतर तातडीने डिझेलचा परतावा म्हणून २५ हजार रुपये द्यायला हवेत आणि त्यांचं पूर्ण कर्ज माफ करायला हवं, अशी मागणीही आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे फडणवीस म्हणाले. जे छोटे स्टॉलधारक आहेत, त्यांना मदत करावी लागेल. पर्यटन व्यवसाय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. या व्यवसायाला एमटीडीच्या माध्यमातून मदत केली पाहिजे. त्यांच्या कर्जावरील व्याज माफ करायला हवं, अशी अपेक्षाही फडणवीस यांनी व्यक्त केली. ५० हजार हेक्टरी मदत ही अत्यंत तोकडी आहे. बागायतीतील झाडं उन्मळून पडली आहेत. ही झाडं पुन्हा लावली तरी पुढची १० वर्षे उत्पादन देऊ शकणार नाहीत. त्यामुळे फळ पिकांची योजना लागू करून त्यांना मदत करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे फडणवीस म्हणाले.
मोठ्या प्रमाणात झाडं पडली असल्याने ती हटवणे आवश्यक आहे. नाहीतर पावसामुळे रोगराई पसरू शकते.

अधिक वाचा  ‘वंचित’ची भूमिका काय? महाविकास आघाडीची साथ, स्वतंत्र लढणार की तिसऱ्या आघाडीची स्थापना

ही समस्या टाळण्यासाठी रोजगार हमी योजनेतून साफसफाई करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले. अन्य मागण्या…
* पत्र्याच्या शिट्सचा काळाबाजार सुरू झाला आहे. तो रोखण्यासाठी तात्काळ ३-४ कंपन्यांशी करार करुन पत्र्यांची एमआरपी घोषित करावी, त्यामुळे काळाबाजार थांबेल.
* अनेकांची घरं पडली आहेत. त्यामुळे जोपर्यंत हे नागरिक घराबाहेर राहतील तोपर्यंत त्यांना घरभाडे द्यावे. आत्मनिर्भर पॅकेजद्वारे ज्या योजना आहेत त्या कोकणात लागू कराव्या.
* चक्रीवादळानंतर १०-११ दिवसानंतरही वादळग्रस्त भारात सरकारचं अस्तित्व काहीच दिसत नाही. आता सरकारने तातडीची मदत देऊन कोकणला उभं करण्यासाठी पावलं उचलण्याची गरज आहे.