नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्रालयाचे (Foreign Ministry) प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांच्या वाचाळ बडबडीनंतर पाकिस्तानला आरसा दाखवलाय. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला डिवचण्यासाठी एक ट्विट केलं होतं. यालाच प्रत्त्यूत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयानं भारताचं करोना आर्थिक पॅकेज पाकिस्तानच्या ‘जीडीपी’पेक्षाही मोठं असल्याचं म्हटलंय.
पाकिस्तानला चांगला सल्ला मिळायला हवा. जीडीपीच्या ९० टक्के कर्ज देशावर आहे, हे पाकिस्ताननं विसरू नये, असंही अनुराग श्रीवास्तव यांनी पाकिस्तानला सुनावलंय.
यामध्ये ‘रिपोर्टनुसार, भारतात ३४ टक्के कुटुंबांना एका आठवड्यात आर्थिक मदत मिळाली नाही तर त्यांचं जगणं कठीण होईल. यासाठी मी भारताची मदत करण्यासाठी तयार आहे. आम्ही आमचा यशस्वी ठरलेला ‘कॅश प्रोग्राम’ शेअर करण्यासाठी तयार आहोत’ असं इम्रान खान यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. पाकिस्तान सरकारनं केवळ नऊ आठवड्यांत १० दशलक्ष कुटुंबांना १२० अब्ज रुपयांची मदत संपूर्ण पारदर्शी पद्धतीनं पुरवले. त्यामुळे गरीब कुटुंबांना करोनाच्या संकटकाळात सहजरित्या मदत उपलब्ध झाली, असं इम्रान खान यांनी म्हटलं होतं.
‘जवळपास ८४ टक्के भारतीय घरांमध्ये लॉकडाऊननंतर मिळकतीत घट झाली आहे. एकूण कुटुंबांपैंकी एक तृतियांश कुटुंबांना अतिरिक्त मदतीशिवाय जगणं कठीण होईल’ असा दावा ‘युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो’ आणि मुंबई स्थित संस्था ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग द इंडियन इकोनॉमी’ यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. या कुटुंबांच्या खात्यात तत्काळ आर्थिक मदत पोहचवण्याची आणि त्यांना भोजन उपलब्ध करून देण्यात अत्यंत गरज असल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय. याच रिपोर्टचा उल्लेख इम्रान खान यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. या ट्विटमागचा उद्देश मदत पुरवण्याचा नाही तर भारतावर निशाणा साधण्याचा होता, हे उघड होतं. त्यामुळेच परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानला त्यांचा खरा चेहरा दाखवला.
पाकिस्तानातील करोना आकडेवारी
पाकिस्तानच्या करोना संक्रमणाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर आत्तापर्यंत देशात १,१९,५३६ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर २३५६ जणांचा करोनामुळे मृत्यू झालाय. तर ३८,३९१ जण करोना संक्रमणातून सहीसलामत बाहेर पडलेत. अद्याप ७८,७८९ जणांवर उपचार सुरू आहेत.

अधिक वाचा  महायुतीचे एकमत हा फॉर्म्युला? भाजप सर्वाधिक जागी मित्रपक्ष भाजप कोट्यातून राष्ट्रवादीला 5 तर शिवसेनेला…