भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये पूर्व लडाख सीमेवरून गेल्या काही दिवसांपासून तणावाचं वातावरण निर्माण झाल आहे. दोन्ही देशांचं सैन्य काही प्रमाणात मागे हटलं असलं तरी सीमेवर अद्यापही सामान्य स्थिती निर्माण झाली नाही. दरम्यान, सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
दोन्ही देशांनी सीमाभागात शांतता सुनिश्चित करण्याबाबतही चर्चा केली असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली. २०१८ मध्ये चीनमधील वुहान शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीननचे राष्ट्राध्यक्ष क्षी. जिनपिंग यांनी शिखर परिषदेत द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर तसंच शांतता प्रस्थापित करण्यावर चर्चा करण्यात आली होती.
“६ जून रोजी भारत आणि चीनच्या लष्कराच्या कमांडर्सची चूसूल मोल्डो क्षेत्रात बैठक पार पडली. भारत-चीन सीमेला लागून असलेल्या भागात उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या लष्करी व मुत्सद्दी पातळीवरील चर्चेचा हा भाग होता. दोन्ही देशांच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली परिस्थितीवर लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे यावर बैठकीत एकमत झालं,” अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली. “भारत-चीन द्विपक्षीय संबंधांच्या पुढील विकासासाठी शांततामय मार्गानं तोडगा निघणं आवश्यक आहे,” असंही ते म्हणाले.
दोन्ही देशांमध्ये सध्या चर्चा सत्र सुरू असूनही चीनने लडाख, उत्तर सिक्कीम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशात वास्तविक नियंत्रण रेषेवरील जवळजवळ सर्व संवेदनशील भागात अधिक सैन्य तैनात केले आहे. हे चीनच्या लष्करी सामर्थ्य वाढवण्याच्या रणनीतीचा एक भाग असल्याची माहिती लष्करातील सूत्रांकडून देण्यात आली आहे.

अधिक वाचा  गोळीबाराच्या घटनेनंतर राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; काय झाली चर्चा?