नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस प्रथम प्राधान्य आहे. कोरोना परिस्थिती सामान्य होईपर्यंत देशात शाळा सुरू होणार नाहीत, असा मोठा खुलासा मनुष्यबळ विकास मंत्रालयालानं केला आहे. 15 ऑगस्टनंतर शाळा सुरू करण्याचा विचार होता, पण आता तसं होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
देशातील कोविड प्रकरणांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरकार येत्या दोन महिन्यांत शाळा उघडण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास तयार आहे. आरोग्य मंत्रालय आणि संबंधित राज्य सरकार यांच्या सल्ला मसलतीनंतर शाळा आणि महाविद्यालये सुरू होऊ शकतात, असं यापूर्वी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सांगितलं होतं. सोमवारी सायंकाळी देशातील सर्व राज्य सरकारच्या सूचना केंद्रात पोहोचल्या आहेत. त्यावर विचार करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
दरम्यान, देशभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. सध्या लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू आहे. काही दिवसांपासून 15 जूनपर्यंत शाळा महाविद्यालये सुरू होणार अशी चर्चा सुरू होती. शाळा- महाविद्यालयं सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही आदेश देण्यात आला नाही, असं यापूर्वी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. शाळा आणि महाविद्यालयं सुरू करण्यासाठी अजूनही परवानगी देण्यात आली नाही. तसे कोणतेही निर्देश राज्यांना देण्यात आले नाहीत. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. अनेक शाळांचं क्वारंटाइन सेंटरमध्ये रुपांतर करण्यात आलं आहे. कोरोनाचं संक्रमण टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिक वाचा  राज ठाकरे नवनवीत राणांचे स्टार प्रचारक? राणांच्या पोस्टरवर राज ठाकरेंचा फोटो