वसई : शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी हे दुग्धव्यवसायाकडे वळले आहेत, परंतु करोना विषाणूच्या संसर्गामुळे मागील दोन महिन्यांपासून असलेल्या टाळेबंदीमुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे. मिठाईची दुकाने, हॉटेल सर्व काही बंद असल्याने दुधाची मागणी घटली आहे तर दुसरीकडे गुरांना लागणारा चाराही पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने अडचणी निर्माण झाल्याचे दुग्धव्यावसायिक शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
वसई विरारसह पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकरी दूध विक्रीचा व्यवसाय करतात. हे दूध डेरीसोबतच आजूबाजूच्या भागात असलेली मिठाईची दुकाने व इतर दुधापासून पदार्थ करण्यासाठी पाठविले जात होते. मात्र सध्या संपूर्ण देशात सध्या करोना विषाणूने थैमान घातले आहे त्यामुळे सर्व काही ठप्प झाले आहे. त्यामुळे शहरातील हॉटेल, मिठाई तयार करण्याची दुकाने सर्व काही बंद आहे त्यामुळे विक्रीसाठी जाणाऱ्या दुधाची मागणी कमी झाली असल्याने आता किरकोळ भावात दुधाची विक्री करावी लागत आहे. त्यातच गुरांना लागणारा चारापाणी यांचे भावही वधारले असल्याने या गुरांचा सांभाळ करणेसुद्धा कठीण होऊन बसले आहे.
दररोज होणाऱ्या दूध विक्रीतून दोन पैसे हाती येतात यावरच या व्यावसायिकांचा उदरनिर्वाह चालतो. परंतु या टाळेबंदीत फक्त घरगुती वापरासाठी लागणाऱ्या दुधाची विक्री सुरू आहे, ते दूधही फार कमी प्रमाणात विकले जात आहे. दूध हे जास्त काळ राहू शकत नसल्याने काही ग्राहकांना स्वस्त दरातच हे दूध विक्री करावे लागत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले आहे.
नवीन दुग्धव्यवसाय सुरू करावा या हेतूने सफाळे येथील विवेक फडके व विनित पाटील या दोन युवा शेतकऱ्यांनी दीड वर्षांपूर्वी ६० ते ७० जर्सी प्रजातीच्या गायी खरेदी करून व्यवसाय सुरू केला होता, परंतु व्यवसाय सुरू केल्यापासून विविध प्रकारची संकटे निर्माण झाली
आहेत.
याआधी अवकाळी झालेल्या पावसामुळे संपूर्ण चारा पाण्यात भिजून मोठे नुकसान झाले होते. त्या वेळी २ रुपये किलोने मिळणारा चारा १६ रुपये किमतीने खरेदी केला होता. त्या संकटातून सावरत नाही त्यातच आता टाळेबंदी यामुळे सर्व आर्थिक गणितच कोलमडून गेले आहे. चारादेखील पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने जनावरांवरही उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी या जनावरांना विकून टाकावे लागले आहे. मोठय़ा आत्मविश्वासाने सुरू केलेला दुग्धव्यवसाय विविध प्रकारच्या संकटांमुळे बंद करावा लागल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
आर्थिक गणित कोलमडले
* टाळेबंदी असल्याने दुधाची विक्री पुरेशा प्रमाणात होत नाही. त्यातच चारापाण्याचा खर्चसुद्धा अधिक आहे त्यामुळे विक्रीतून येणारा पैसा हा चारापाणी व मजुरीसाठी खर्च करावा लागत आहे.
* या वाढीव खर्चाचा मेळ कसा बसवावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संकटसमयी अनेकांकडे पैसेसुद्धा नाहीत त्यामुळे काहीजणांना उधारीवरसुद्धा दूध दिले जात आहे.
टाळेबंदीमुळे कमी भावात दुधाची विक्री करावी लागत आहे. चारापाणीहीसुद्धा उपलब्ध होत नसल्याने कधी कधी अडचणी निर्माण होतात त्यामुळे या जनावरांचा सांभाळ करणे कठीण होत आहे.

अधिक वाचा  क्लासेनने ठोकल्या 80 धावा, तरी अभिषेक शर्माला प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड का?