देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच राज्यातही करोनाबाधितांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात रविवारी ३००७ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ९१ करोनाबाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली होती. रविवारी करोनाबाधितांची एकूण संख्या ८५ हजार ९७५ वर पोहोचली होती. दरम्यान, करोनाग्रस्तांच्या एकूण संख्येत महाराष्ट्रानं चीनलाही मागे टाकलं आहे.
महाराष्ट्रातील करोनाबाधितांची एकूण संख्या ८५ हजार ९७५ वर पोहोचली तर चीनमध्ये करोनाबाधितांची संख्या ८३ हजार ०३६ इतकी आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येपैकी अर्ध्या रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात सध्या ४३ हजार ५९१ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत ३९ हजार ३१९ करोनाबाधितांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. दरम्यान, आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील रिकव्हरी रेट ४५.७२ टक्के इतका आहे.
सर्वात चिंताजनक बाब ही मुंबईमध्ये आहे. मुंबईत एकूण रुग्णसंख्या ही ४८ हजार ७७४ वर पोहोचली आहे. तर केवळ मुंबईत करोनामुळे १ हजार ६३८ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारपर्यंत राज्यातील ५ लाख ५१ हजार ६४७ लोकांचे नमूने तपासण्यात आले. त्यापैकी ८५ हजार ९७५ लोकांना करोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. ही संख्या एकूण चाचण्यांच्या संख्येच्या १५.५८ टक्के इतकी आहे. आतापर्यंत चीनमध्ये ८३ हजार ०३६ करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. त्यापैकी हुबेई प्रांतातच ६८ हजार करोनाग्रस्तांची नोंद झाली. तर या ठिकाणी आतापर्यंत ४ हजार ५०० जणांचा मृत्यू झाला आहे. हुबेई प्रांतातच करोनाचं सर्वात मोठं केंद्र समजलं जाणारं वुहान हे शहरदेखील आहे.

अधिक वाचा  गैरविश्वास दाखवला तर ‘हे’ लक्षात ठेवा, पक्षप्रवेशाच्याच दिवशी मोहिते पाटलांचा आढळरावांना मोठा इशारा