नवी दिल्ली : जागतिक हवामानशास्त्र संस्था म्हणजेच डब्ल्यूएमओने भारतीय हवामानशास्त्र संस्थेला आपल्या अचूक अंदाजाबद्दल कौतुकाची थाप दिली आहे. अम्फान चक्रीवादळाच्या आयएमडीच्या अचूक अंदाजामुळे मोठं नुकसान टाळण्यासाठी मदत झाली. या पार्श्वभूमीवर डब्ल्यूएमओचे महासचिव ई मनियांकोवा यांनी आयएमडीचे महासंचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांना पत्र लिहून प्रशंसा केली. आयएमडीने डब्ल्यूएमओलाही चक्रीवादळाची सूचना दिली, विशेषतः बांगलादेशसाठीची सूचना महत्त्वाची होती, असं ते पत्रात म्हणाले.
अम्फान या चक्रीवादळाने पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये प्रचंड नुकसान झालं. पण अगोदरच इशारा देण्यात आला असल्यामुळे जीवितहानी टाळता आली. अम्फान चक्रीवादळ सुंदरबन आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्याला अत्यंत रौद्ररुप घेऊन २० मे रोजी धडकलं होतं. उत्तर भारतीय सागरी चक्रीवादळांसाठीचं विशेष प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र दिल्लीमध्ये आहे.
या केंद्राच्या माध्यमातून आयएमडीकडून उत्तर भारतीय सागरी क्षेत्र, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर क्षेत्रातील सर्व देशांना चक्रीवादळांची माहिती दिली जाते. ‘आयएमडी आणि दिल्लीतील केंद्राकडून चक्रीवादळाची उत्पत्ती, ट्रॅकिंग, तीव्रता, जमीनप्रवेश केंद्र यासह वाऱ्याच्या लाटांसंबंधी हवामान, पाऊस अशी माहिती तीन दिवस अगोदरच देण्यात आली होती, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात मदत झाली. यामुळे चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी करता आली’, असं पत्रात म्हटलं आहे.
आयएमडीने बजावलेली सेवा हा एक उत्तम धडा आहे. चक्रीवादळ प्रभावित क्षेत्रात कमीत कमी जीवित आणि वित्तहानी करण्यासाठी अशाच अचूक अंदाजाची गरज आहे. आयएमडीकडून सूचना जिनेव्हामधील डब्ल्यूएमओच्या सचिवालयात आणि सिंगापूर, बहरेन या प्रादेशिक केंद्रांसह समन्वय केंद्रातही देण्यात आल्या होत्या. आयएमडीकडून येणारी माहितीच संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांना देण्यात आली. अम्फान चक्रीवादळांमुळे काय नुकसान होऊ शकतं हे दाखवण्यासाठी संबंधित संस्था आणि संयुक्त राष्ट्रासाठीही आयएमडीचीच माहिती वापरण्यात आली.

अधिक वाचा  पुणे विधानसभा जागावाटप ‘ठिणगी’? महायुतीत 0 जागा तरी माविआत ‘त्या’ 5 जागा ठाकरेंच्या सेनेला हव्यात!