बिहार विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी या निवडणुकीचे रणशिंग रविवारी फुंकले. अमित शाह यांनी व्हर्च्युअल रॅली घेत बिहारमधील जनतेला संबोधित केलं. ही रॅली जवळपास ४० लाख लोकांनी बघितल्याचा दावा भाजपाचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी केला आहे. दरम्यान, शाह यांच्या पहिल्या रॅलीवर राजदचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी टीका केली आहे. त्याचबरोबर शाह यांच्या रॅलीसाठी वापरण्यात आलेल्या LED स्क्रीनवर भाजपानं १४४ कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला आहे.
देशावर करोनाचं संकट ओढवलं आहे. तर दुसरीकडे काही राज्यातील विधानसभा निवडणुकाही जवळ येऊ लागल्या आहेत. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्हर्च्युअल रॅलीतून प्रचाराचा बिगुल फुंकला. आउटलूकनं सूत्रांच्या माहितीवरून दिलेल्या वृत्तानुसार शाह यांच्या या व्हर्च्युअल रॅलीसाठी भाजपानं तब्बल १०,००० मोठ्या एलईडी स्क्रीन बसवल्या होत्या. तर संपूर्ण राज्यात ५०,००० अधिक स्मार्ट टिव्हींची व्यवस्था करण्यात आली होती.
भाजपाच्या पहिल्या व्हर्च्युअल रॅलीवर झालेल्या खर्चावरून राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी मोठा आरोप केला आहे. “प्रसारासाठी एका एलइडीचा खर्च सरासरी २०,००० इतका आहे. रॅलीमध्ये ७२ हजार एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या म्हणजे तब्बल १४४ कोटी रूपये फक्त एलईडी स्क्रीनवर खर्च करण्यात आले. श्रमिक एक्स्प्रेसच्या भाड्यापोटी झालेले ६०० कोटी देण्यासाठी ना सरकार समोर आलं, ना भाजपा. यांची प्राथमिकता गरीब नाही, तर निवडणूक आहे,” असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला आहे.
“मुंबई, दिल्ली, हरियाणा, गुजरात, तामीळनाडू असा देशातील कुठलाही कोपरा घ्या, तिथल्या विकासाचा पाया बिहारच्या मजुरांच्या घामातून उभा राहिलेला दिसेल. जे लोक बिहारच्या मजुरांचा अपमान करत आहेत, त्यांना या मजुरांच्या भावभावनांची किंमत कळलेली नाही. पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बिहारच्या मजुरांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगितले. त्यासाठी राज्यांना केंद्राने ११ हजार कोटी रुपये दिले. मजूर पायी निघाले तेव्हा त्यांच्यासाठी रेल्वेगाड्या, बसगाडय़ांची सोय केली. त्यांना जेवण-पाणी, औषधे दिली. मजुरांच्या प्रवासाचा ८५ टक्के खर्च केंद्राने केला, असा दावा शहा यांनी व्हर्च्युअल रॅलीत केला होता.

अधिक वाचा  तुरुंगातून सरकार चालवणे शक्य आहे का? राज्यपालांचा स्पष्ट नकार; दिल्लीत आता काय होणार?