केरळमध्ये एका गर्भवती हत्तीणीची निर्दयीपणे हत्या झाल्याच्या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत असतानाच अशीच अजून एक घटना समोर आली आहे. कोल्लम जिल्ह्यात एका महिन्यापूर्वी एका तरुण हत्तीणीचा मृत्यू झाला होता. यावेळी तिच्या तोंडात जखमा झाल्याचं समोर आलं होतं. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे.
केरळमध्ये २७ मे रोजी एका जंगली गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खायला घालण्यात आल्यानंतर, पोटात झालेल्या स्फोटामुळे तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. भुकेने व्याकूळ असल्याने ही हत्तीण मानवी भागात अन्नाच्या शोधात आली होती. यावेळी तिला फटाक्यांनी भरलेलं अननस खायला घालण्यात आलं. तीन दिवस हत्तीण पाण्यातच मृत्यूची वाट पाहत उभी होती. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचून हत्तीणीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. पण अखेर तिचा मृतदेहच बाहेर काढावा लागला.
एका वरिष्ठ वन अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, “एप्रिल महिन्यात कोल्लम जिल्ह्यातील पथनपुरम जंगल क्षेत्रात एका हत्तीणीचा अशाच पद्धतीने मृत्यू झाला होता. जंगल क्षेत्रापासून काही अंतरावर हत्तीण गंभीर अवस्थेत आढळली होती. ही हत्तीण आपल्या कळपापासून दूर आली होती. तिचा जबडा तुटला होता, काही खाणंही तिला शक्य होत नव्हतं”.
“हत्तीणीची प्रकृती खूप नाजूक होती. जेव्हा वन अधिकारी पोहोचले तेव्हा हत्तीण जंगलात पळाली आणि तिथे वाट पाहणाऱ्या आपल्या कळपात शिरली. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा हत्तीण आपल्या कळपापासून दूर आली असल्याचं दिसलं. तिला योग्य उपचार देण्यात आले पण दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला,” अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. याप्रकरणी तपास सुरु असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
आपली ओळख उघड न करण्याच्या अटीवर अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “हत्तीणीने फटाक्यांनी भरलेलं अन्न खाल्याचा संशय आहे. तिच्या तोंडात त्याचा स्फोट झाला. आम्ही शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहोत”.
अशा घटनांचा तपास करणं फार कठीण असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. “अशा घटनांमध्ये माहिती गोळा करणं फार कठीण काम असतं. जंगली हत्ती एका दिवसात अनेक किमी प्रवास करत असल्याने त्यांनी नेमकं कुठे खाल्लं असावं किंवा घटना कुठे घडली असावी याचा अंदाज येत नाही. कळपातून बाहेर आलेले हत्ती जखमी किंवा आजारी अवस्थेत सापडल्यानंतर वन विभागाला याची माहिती मिळते. यादरम्यान अनेक आठवडे उलटलेले असल्याने तपास खूपच आव्हानात्मक असतो,” असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

अधिक वाचा  ‘वंचित’ची भूमिका काय? महाविकास आघाडीची साथ, स्वतंत्र लढणार की तिसऱ्या आघाडीची स्थापना