मुंबई: करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. ‘करोना बळींच्या संख्येमध्ये स्पष्टता नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. ‘करोनामुळं झालेले अनेक मृत्यू नैसर्गिक किंवा अन्य कारणांमुळं झाल्याचं दाखवण्यात येत असल्यामुळं संसर्गाचा धोका वाढत आहे,’ असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
मुंबईत कोविड चाचण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याबद्दल फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली आहे. ‘राज्यातील एकूण चाचण्यांमध्ये १ मे रोजी मुंबईतील प्रमाण ५६ टक्के होते. ३१ मे रोजी हेच प्रमाण २७ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. चाचण्यांची संख्या कमी झाली असताना करोनाबळींची संख्या मात्र झपाट्यानं वाढतेय. राज्यात २७ मे पर्यंत एका दिवसातील मृतांची सर्वाधिक संख्या १०५ होती. पुढच्या दोन दिवसांत ती ११६ वर पोहोचली आणि ३ जून रोजी १२२ मृत्यू होऊन नवा उच्चांक प्रस्थापित झाला. मुंबईमध्ये देखील करोना बळींची संख्या कशी वाढते आहे याची आकडेवारीच त्यांनी दिली आहे.
सरकारी रेकॉर्डवर करोना बळींची संख्या दाखवली जात असली तरी अनेकांच्या मृत्यूपत्रातून ‘करोना’ किंवा ‘करोना संशयित’ हे शब्द वगळण्यात आले आहेत. मुंबईतील भांडुप आणि विलेपार्ले येथील मृतांचे दाखलेही फडणवीस यांनी दिले आहेत. मृत्यूचं कारण स्पष्ट नसलेल्या अशा लोकांच्या अंत्यसंस्काराला होणाऱ्या गर्दीमुळं संसर्ग पसरण्याचा धोका आहे,’ अशी भीती पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
निसर्ग वादळातून मुंबई वाचली असली तरी करोनाच्या वादळाला सुद्धा तितक्याच गांभीर्यानं घ्यावं लागेल. करोनाबळी स्पष्टपणे दर्शवले तरच संसर्गाचा पुढील धोका टाळता येईल. मुंबईत चाचण्यांची संख्या वाढवावी लागेल. संसर्गाचा दर अधिक असतो तेव्हा नमुने तपासणी पूर्वीपेक्षा किमान दोन पटीने वाढवणे आवश्यक असते. मुंबईत मात्र ते ५० टक्क्यांहून अधिक प्रमाणात कमी करण्यात आले आहेत. १० हजार चाचण्यांची क्षमता असताना मुंबईत केवळ साडेतीन ते चार हजार चाचण्याच होत आहेत. करोना रुग्णांची आकडेवारी कमी-अधिक दाखवून फायदा नाही तर करोनाच्या प्रादुर्भावाला अटकाव घालणं आवश्यक आहे,’ असा टोलाही शेवटी फडणवीसांनी हाणला आहे.

अधिक वाचा  केंद्रीय ‘सामाजिक न्यायमंत्री’ आठवले न्यायाच्या प्रतीक्षेत; ‘शिर्डी’चा प्रभावी आग्रह की ‘आरपीआय’चे पेल्यातीलच वादळ?