अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये काल रात्री फोनवरुन चर्चा झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींनी या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या G 7 देशांच्या परिषदेला उपस्थित राहण्याचे औपचारिक निमंत्रण दिले. डोनाल्ड ट्रम्प यांना G 7 देशांच्या संघटनेचा विस्तार करायचा आहे. त्या दृष्टीने ट्रम्प यांनी उचलले हे पाऊल आहे. जगातील महत्वाच्या अर्थव्यवस्थांना G 7 मध्ये प्रतिनिधीत्वाची संधी देण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे.
अमेरिकेत वर्णद्वेषावरुन तणाव असतानाही ट्रम्प आणि मोदी यांच्यामध्ये २५ मिनिटे चर्चा झाली. लडाखमध्ये भारत-चीनमध्ये सुरु असलेला सीमावाद, करोना व्हायरसमुळे निर्माण झालेले संकट आणि जागतिक आरोग्य संघटनेत सुधारणा या मुद्दांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
ट्रम्प यांच्याशी बोलताना अमेरिकेत सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी चिंता व्यक्त केली व लवकरात लवकर या परिस्थितीतून मार्ग निघावा अशी इच्छा व्यक्त केली. G 7 देशांच्या संघटनेचा विस्तार करण्याच्या ट्रम्प यांच्या भूमिकेचे मोदींनी कौतुक केले. ‘यातून दूरदृष्टी दिसते करोनानंतरच्या जगाचे ते वास्तव आहे’ असे मत मोदींनी व्यक्त केले. ‘परिषद यशस्वी करण्यासाठी अमेरिका आणि अन्य देशांसोबत मिळून काम करायला भारताला आनंदच होईल’ असे पंतप्रधान म्हणाले.

अधिक वाचा  मॅच जिंकताच विराटचा अनुष्काला व्हिडीओ कॉल; मुलांना दिले फ्लाइंग किस