बीजिंग: करोना संसर्गाच्या मुद्यावरुन अमेरिका आणि चीनमधील तणाव सातत्याने वाढत आहे. चीन आणि अमेरिका या दोन देशांमध्ये शीत युद्धासारखी स्थिती निर्माण झाली आहे. भारताने या शीत युद्धात पडू नये, असा इशारा चीनने भारताला दिला आहे. या शीत युद्धात भारत सहभागी झाल्यास त्याचे परिणाम वाईट होतील असे चीनने म्हटले आहे.
चीन सरकारच्या ‘ग्लोबल टाइम्स’मध्ये आलेल्या लेखानुसार, भारतात राष्ट्रवादी भावना मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. चीन व अमेरिकेत सुरू असलेल्या शीत यु्द्धाच्या परिस्थितीचा लाभ घेण्यासाठी या भावनेचा वापर केला जात आहे. मात्र, या शीत युद्धात सहभागी होण्याबाबत भारताने सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे चीनने म्हटले आहे. भारताने अमेरिकेचा भागीदार म्हणून साथ दिल्यास त्याचे वाईट परिणाम होतील असा इशारा चीनने दिला आहे. शीत युद्धात भारताने अमेरिकेला साथ दिल्यास किंवा चीनवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेचा प्यादा म्हणून काम केल्यास दोन आशियाई देशांमधील आर्थिक आणि व्यापारी संबंधावर वाईट परिणाम होतील. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठे नुकसानही सहन करावे लागू शकते असे चीनने म्हटले आहे.
दरम्यान, भारत-चीनमधील सीमा प्रश्नी मध्यस्थी करण्याची तयारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दर्शवली होती. ट्रम्प यांच्या प्रस्तावाला भारत आणि चीननेही नकार दिला. चीन आणि भारत सीमा प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम असून तिसऱ्या देशाने मध्यस्थी करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत चीनने अमेरिकेला ठणकावले होते.

अधिक वाचा  कीर्तनकारांनी 5 हजार जास्त घेतले की…इंदुरीकर महाराजांनी असे घेतले फैलावर