करोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिलेल्या १८ जणांना करोनाची बाधा झाल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये घडली आहे. यासंदर्भातील माहिती सरकारी अधिकाऱ्यांनीच दिल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
उल्हासनगर महानगर पालिकेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील रुग्णालयामध्ये एक ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या महिलेच्या अंत्यसंस्काराला ७० जण उपस्थित होते. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित व्यक्तींनाच स्मशानभूमीमध्ये प्रवेश दिला जात असतानाच या नियमांचे उल्लंघन करुन एवढ्या मोठ्या संख्येने लोकं या महिलेच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले होते. या महिलाचा मृत्यू करोनासदृष्य लक्षणांमुळे झाला होता. या महिलेची करोना चाचणी करण्यात आली होती. मात्र मृत्यू होईपर्यंत चाचणीचे निकाल आलेले नव्हते. त्यामुळेच रुग्णालयामधून महिलाचा मृतदेह मोठ्या प्लॅस्टीकच्या बॅगमध्ये बांधून नातेवाईकांच्या हवाली करण्यात आला होता. कोणत्याही परिस्थितीमध्ये मृतदेह उघडू नये अशा सूचना रुग्णालय प्रशासनाने दिल्या होत्या. मात्र २५ मे रोजी अंत्यस्काराच्या वेळी नातेवाईकांनी नियमांचे उल्लंघन करुन अंत्यदर्शनासाठी मृतदेह पिशवीमधून बाहेर काढला.
या अंत्यसंस्कारासंदर्भात पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर तातडीने स्थानिक प्रशासनाला यासंदर्भात माहिती देण्यात आली. या अंत्यसंस्काराला उपस्थित असणाऱ्या ७० जणांची करोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचे निकाल शुक्रवारी हाती आले. त्यामध्ये या महिलेच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असणाऱ्या ७० पैकी १८ जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी या प्रकरणात मृत महिलेच्या नातेवाईकांविरोधात साथीचे रोग प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
अशाच प्रकारे महिन्याभरापूर्वी एका ५० वर्षीय पुरुषाचा करोनामुळे मृत्यू झाला होता. त्या पुरुषाच्या अंत्यसंस्काराच्या आधी त्याचा मृतदेह प्लॅस्टीकच्या पिशवीमधून बाहेर काढण्यात आला होता. त्यामुळेच २० जणांना करोनाचा संसर्ग झाला होता. करोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह ताब्यात देताना रुग्णालय प्रशासनाकडून सूचना दिल्या जातात. मात्र काहीजण त्याचे पालन करताना दिसत नाहीत.

अधिक वाचा  राजू शेट्टी यांनी पाठिंबा न घेतल्यास उमेदवार देणार, हातकणंगले लोकसभेसाठी मविआची स्ट्रॅटेजी ठरली!