राज्यात २०१९ची विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर अनेक राजकीय नाट्यं बघायला मिळाली. मुख्यमंत्रिपदावरून भाजपा शिवसेनेतील मतभेद टोकाला गेले. दोन्ही पक्षातील संबंध इतके ताणले गेले की, नंतर शिवसेनेनं भाजपापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या राजकीय नाट्याची अनेक कारणं नंतर चर्चिली गेली. पण, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपापासून दूर जाण्याचं एक कारण बोलून दाखवलं आहे.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आजतक या वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील करोनाची परिस्थिती आणि राजकीय विषयावर भाष्य केलं. “तिन्ही पक्षांची विचारधारा वेगवेगळी आहे. मात्र, तिन्ही पक्ष एकजुटीनं राज्यात काम करत आहे. त्यामुळे विरोधकांना डोकेदुखी सुरू झाली आहे. तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याचा आरोप चुकीचा आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती कशी आहे, हे फडणवीसांनाही माहिती आहे. विरोधी पक्षात असल्यानं ते आरोप करत आहेत. पण, मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या शहराची स्थिती सगळ्यानांच माहिती आहे. राजकारण विसरून सगळ्यांना एकत्र येऊन काम करावं लागेल,” असं राऊत म्हणाले.
“मागील ३० वर्षांपासून शिवसेना भाजपासोबत होती. शिवसेनेमुळे युती तुटली, हा आरोप चुकीचा आहे. टाळी कधीही एका हातानं वाजत नाही. भाजपाच्या वाईट काळात शिवसेना त्यांच्यासोबत राहिली. पण, भाजपाला सत्तेची लालची आहे. सत्तेसाठी ते आपल्या मित्र पक्षाचं बलिदान देऊ पाहत होते. त्यामुळे आज शिवसेना भाजपासोबत नाही,” असं राऊत यांनी सांगितलं. राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाविषयीही राऊत यांनी भाष्य केलं. “काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं विधान खरं आहे. काँग्रेसचे मोठे नेते राज्यातील निर्णयांमध्ये सहभागी होत नाही,” असं राऊत यांनी सांगितलं.

अधिक वाचा  कोथरूड थोरात उद्यान्यामधील मोनोरेल प्रकल्प नागरिकांच्या इच्छेविरुद्ध होणार नाही: मनपा आयुक्त