न्यूयॉर्क : करोनाचा प्रादुर्भाव पाहता संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने आपल्या पाच अस्थायी जागांसाठी पुढील महिन्यात नवीन निवडणूक प्रक्रिये अंतर्गत निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एशिया पॅसिफिक’ जागेसाठी एकमेव दावेदार असल्याने ही जागा भारताला मिळण्याचे निश्चत मानले जात आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर १९३ सदस्यांच्या महासभेने शुक्रवारी पूर्ण बैठकीऐवजी गुप्तमतदान प्रक्रियेद्वारे निवडणूक घेण्यासंबंधी निर्णय घेतला. या निर्णयानुसार सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यांची निवड, तसेच आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या सदस्यांची निवड पूर्ण बैठकीशिवाय जून २०२०मध्ये करण्यात येणार आहे.
पाच अस्थायी सदस्यांसाठी २०२१-२२ या सत्रासाठी १७ जून रोजी निवडणूक होणार होती. भारत हा अस्थायी सदस्याच्या जागेवरील उमेदवार असून, एशिया पॅसिफिक गटातील एकमेव उमेदवार असल्यामुळे भारताचा विजय निश्चित मानला जात आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये एशिया पॅसिफिक गटातील भारताच्या उमेदवारीला ५५ सदस्यांनी एकमताने अनुमोदन दिले होते. यात चीन आणि पाकिस्तानचाही समावेश आहे. भारताच्या दृष्टिकानातून पाहायचे झाले तर, निवडणूक प्रक्रियेत कोणताही बदल केला तरी भारताच्या उमेदवारीवर परिणाम होणार नाही.

अधिक वाचा  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नतेचा मोठा निर्णय; ११० महाविद्यालये रडारवर एप्रिल अखेर यादीच प्रसिद्ध