मुंबई: महाराष्ट्रातील २०१९ सालच्या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी ‘मिरची हवन’ हा तांत्रिक विधी केला होता, अशी माहिती समोर आली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात सत्तास्थापनेबाबत बोलणी सुरु असताना फडणवीस यांनी अजित पवार यांना आपल्या बाजूने वळवून घेतले होते. यानंतर २३ नोव्हेंबरला सकाळी राजभवनात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शपथविधीचा कार्यक्रम पार पडला होता. या शपथविधीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मिरची हवन केले होते, असा दावा चेकमेट: हाऊ द बीजेपी वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र (Checkmate: How the BJP Won and Lost Maharashtra) या पुस्तकात करण्यात आला आहे. सुधीर सूर्यवंशी यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
गेल्यावर्षी झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. यानंतर भाजप सहजपणे शिवसेनेला सोबत घेऊन सत्तास्थापन करेल, असे वाटत होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाची दुसरी टर्म निश्चित मानली जात होती. परंतु, शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय नाट्याला सुरुवात झाली होती. यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात सत्तास्थापनेबाबत बोलणी सुरु होती. ही बोलणी अंतिम टप्प्यात असतानाच अचानक देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांनी २३ नोव्हेंबरच्या पहाटे राजभवनावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, नंतरच्या काळात राष्ट्रवादीच्या आमदारांची जुळवाजुळव करण्यात अपयश आल्यामुळे अजित पवारांचे बंड फसले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना अवघ्या काही तासांत मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते.
या सगळ्या घडामोडींचा उल्लेख Checkmate: How the BJP Won and Lost Maharashtra या पुस्तकात आहे. फडणवीस यांनी शपथ घेण्याआधी केलेल्या ‘मिरची हवन’चाही उल्लेख पुस्तकात आहे. मध्य प्रदेशच्या नालखेडा येथील बागलामुखी मंदिराच्या पुजाऱ्यांकडून फडणवीसांनी हे हवन करून घेतले होते. उत्तराखंडमधील हरीश रावत सरकार या ‘मिरची हवन’मुळे वाचल्याचे फडणवीसांना सांगण्यात आले होते. त्यानुसार फडणवीसांनी हे हवन केले होते. मिरची हवन करणाऱ्या तांत्रिकाच्या सांगण्यावरूनच शपथविधीच्या वेळी फडणवीसांनी त्यांच्या आवडत्या निळ्या रंगाच्या जॅकेटऐवजी काळ्या रंगाचं जॅकेट घातले होते, असेही पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.

अधिक वाचा  नवनीत राणांच्या विरोधात आमदार बच्चू कडूंची नवी खेळी, मोठ्या उमेदवाराची करणार घोषणा ?