वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे. करोना संसर्गाबाबतची परिस्थिती हाताळण्यात आलेली परिस्थिती आणि कृष्णवर्णीय नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्यांवरून ओबामा यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. अनेक जण प्रमुख असल्याचे ढोंग करूही शकत नाहीत, हे करोना संसर्गात काळामध्ये दिसून आले असल्याचे ओबामा यांनी म्हटले.
महाविद्यालये व विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, ओबामा यांनी सध्याचे नेतृत्व या आव्हानामध्ये उघडे पडल्याची टीका केली. अनेक माणसांना वाटते, की ते प्रमुख आहेत आणि ते काय करत आहेत, हे त्यांना माहीत आहे. मात्र, त्यांच्याकडे प्रश्नांची उत्तरे नाहीत,असे त्यांनी म्हटले. ओबामा यांनी गेल्या महिन्यात त्यांच्या कार्यकाळातील अधिकारी वर्गाशी संवाद साधला. त्यामध्येही त्यांनी करोना विषाणूची परिस्थिती ही पूर्णपणे गोंधळाची आपत्ती आहे, असे म्हटले होते. करोनाच्या काळामध्ये कृष्णवर्णीय जनतेवर झालेल्या परिणामांचा उल्लेख करताना, या आजाराच्या काळामध्ये या समाजावर असमानता आणि अन्य बोजाही वाढणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. ‘अनेक जणांना आपण काय करत आहोत, हेही कळत नाही. करोना प्रादुर्भावाच्या काळामध्ये या सर्वांचे खरे रूप उघड झाले आहे. या आव्हानानंतर जग पूर्वीपेक्षा जास्त चांगले होणार असेल, तर ती जबाबदारी तुमची असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
अन्य नागरिकांच्या तुलनेत आफ्रिकी-अमेरिकी नागरिकांची संख्या व्यस्त असल्याचा संदर्भ ओबामा यांच्या या विधानामागे आहे. ओबामा हे सामान्यपणे कमी बोलणारे राजकीय नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. मात्र, गेल्या आठवड्यात ट्रम्प आणि ओबामा यांच्यात सोशल मीडियावरही चकमक झडली आहे. करोना संसर्गाचा जगात अमेरिकेला सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिकेतील मृतांची संख्या ८८ हजारांच्या पुढे गेली आहे, तर रुग्णांची संख्या १४ लाख ६० हजारांवर गेली आहे.

अधिक वाचा  अंबादास दानवे यांना पक्षात घेण्यासाठी भाजप-शिंदे गटाकडून फोनवर फोन…; दानवेंची भूमिका काय?