नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांनी आज, शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला आर्थिक पॅकेजवर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले. देशातील गरजू लोकांना पैसे कर्जरुपाने न देता पैसे थेट लोकांच्या खात्यात जमा करावेत असे आवाहन त्यांनी मोदी सरकारला केले आहे. कर्जरुपाने पैसे देण्याचे पाहून आपण निराश झालो असल्याचेही ते म्हणाले. सरकारने देऊ केलेले पॅकेज शेतकरी, व्यापारी आणि स्थलांतरित मजुरांसाठी उपयोगाचे नाही, असेही राहुल म्हणाले.
रस्त्यावर चालणाऱ्या स्थलांतरित मजुरांना कर्जाची नव्हे तर पैशांची गरज असते. जेव्हा मूल रडते, आई त्याला कर्ज देत नाही, त्याला शांत करण्याचा एक उपाय शोधते आणि तिच्यावर उपचार करते. सावकाराप्रमाणे सरकारला आईसारखे वर्तन करावे लागेल, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
ते पुढे म्हणाले की, सरकार, विरोधी पक्ष आणि माध्यमांनी सर्वांनी एकत्र येऊन अशा लोकांसाठी काम केले पाहिजे. सरकारने सर्व बाधित लोकांच्या बँक खात्यावर थेट पैसे पाठवण्याची आवश्यकता आहे.
वाढत्या वित्तीय तुटीमुळे एजन्सींच्या दृष्टीने भारताचे रेटिंग कमी होईल, असे म्हटले जात आहे. मला वाटते सध्या भारताबाबत विचार करा, रेटिंगबद्दल नाही. भारतातील सर्व लोक व्यवस्थित असतील तर ते पुन्हा एकत्र काम करतील आणि रेटिंग आपोआप ठीक होईल, असे राहुल म्हणाले.
देशभरात लागू करण्यात आलेले लॉकडाऊन हळूहळू समजुतदारपणे उठवण्याची आवश्यकता आहे. कारण आपल्या सर्व समस्यांवरचा तो उपाय नाही. आम्हालावृद्ध आणि मुलांची काळजी घेत लॉकडाउन उठवण्याचाव विचार करावा लागेल. कोणलाही धोका निर्माण होणार नाही याचा विचार करावा लागेल, असेही ते पुढे म्हणाले.
राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी काय केले असते?, असा प्रश्न राहुल यांना या वेळी विचारण्यात आला. मी पंतप्रधान नाही. परंतु विरोधी पक्षाचा नेता म्हणून मी जरूर हे सांगेन की, कोणी घर सोडून दुसऱ्या राज्यात जातो तो कामाच्या शोधात. त्यामुळे सरकारने रोजगाराच्या मुद्द्यावर राष्ट्रीय धोरण आखले पाहिजे, असे ते म्हणाले.
सरकारने लघु, मध्यम आणि दीर्घ कालावधीनुसार काम केले पाहिजे असे आपल्याला वाटत असल्याचे ते म्हणाले. लघु कालावधीत मागणी वाढवा. यात देशातील छोटे आणि मध्यम व्यापाऱ्यांना मदत करा. त्याना रोजगार द्या. आर्थिक मदत द्या. ज्यांना सर्वाधिक धोका आहे अशांच्या आरोग्याची काळजी घ्या. तर मध्यम कालावधीत छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांना मदत करा. देशातील ४० टक्के रोजगार याच लोकांकडून मिळतो. म्हणून त्यांना आर्थिक मदतही दिली पाहिजे. बिहारसारख्या राज्यांमध्ये रोजगार वाढवण्यावर लक्ष दिले गेले पाहिजे, असे राहुल म्हणाले.

अधिक वाचा  दिलीप वळसे पाटीलांचा अपघात, हात फॅक्चर, खुब्यालाही मार