मुंबई : मुंबईतील पालिकेच्या, अनुदानित शाळांमध्ये करोना उपचार केंद्र सुरू करण्यात येत असून तेथे शिक्षकांना काम देण्यात आले आहे. संघटना आणि शिक्षकांकडून केंद्रावर काम करण्यास नकार देण्यात येत आहे. दरम्यान, जवळपास ९ हजार शिक्षकांना हजर होण्याचे आदेश असताना जेमतेम साडेपाचशेच शिक्षक हजर झाले आहेत.
करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन शाळांमध्ये करोना उपचार केंद्र सुरू करण्याची तयारी प्रशासन करीत आहे. या केंद्राची व्यवस्था राखण्यासाठी शिक्षकांचीच नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षकांना तातडीने क्षेत्रीय कार्यालयांशी संपर्क साधण्याचे आदेशही प्रशासनाने दिले होते. मात्र, करोना उपचार केंद्रांवर काम करण्यास शिक्षक नाराज आहेत. मुंबईतील शाळांमध्ये काम करणारे शिक्षक उपनगरांमध्ये राहतात त्यांना शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नाहीत. काही शिक्षक टाळेबंदीपूर्वीच गावी गेले आहेत. त्यांनाही परत येण्यास अडचणी आहेत. शिक्षकांची केंद्रावर नियुक्ती करण्यास संघटनांनीही विरोध केला आहे. शिक्षकांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्नही संघटनांनी उपस्थित केला आहे.

अधिक वाचा  अरुणाचल प्रदेशातील टॅक्सीवाल्याने नागपूरकरांकडून पैसे घेतले नाही, कारण…नितीन गडकरी यांनी सांगितला तो किस्सा