नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पार पडलं. 17 मे रोजी लॉकडाउन संपण्यापूर्वी होणार्‍या या महत्त्वपूर्ण चर्चेत, स्थलांतरित कामगार आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यावर भर देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘आहे त्या ठिकाणीच राहण्याचा सुचना दिल्या असतानाही लोकांना घरी जायचं आहे. खरंतर हा मानवी स्वभाव आहे. यामुळे, आम्हाला निर्णय बदलवावे लागले, परंतु असं असूनही संक्रमण पसरू नये आणि खेड्यांपर्यंत व्हायरसचा धोका होऊ नये याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.’ हेच आमच्यासमोर सर्वात मोठं आव्हान असल्याचं पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं.
बैठकीत गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा केली आणि आरोग्य सेतु अॅपच्या वापरावर भर दिला. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी या अ‍ॅपचे डाऊनलोड वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, कारण यामुळे संक्रमित लोकांना ओळखण्यात मदत होते.
दरम्यान, मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वेसेवा सुरू करावी. मजुरांची ने-आण करतांना संसर्ग होणार नाही याची राज्यांनी काळजी घ्यावी आणि शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळावे, जीएसटी परतावा मिळावा अशा मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आल्या आहेत.
राज्याच्या आर्थिक कामांवर भर द्या
कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी रविवारी राज्यांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिव यांच्याशी चर्चा केली. गौबा म्हणाले की, आता राज्य सरकारने आर्थिक उपक्रम सुरू करण्यासाठी आग्रह धरला पाहिजे. सरकार स्थलांतरितांसाठी कामगार विशेष गाड्या धावत आहेत. सर्व राज्यांनी अधिकाधिक सहकार्य करावं आणि वंदे भारत मिशन अंतर्गत अडकलेल्या लोकांना परत घरी जाण्यासाठी मदत करावी.
राज्यांनी रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनवर विचारला प्रश्न
सूत्रांच्या माहितीनुसार, कॅबिनेट सचिवांशी चर्चेत अनेक राज्यांनी रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये बनवलेल्या नियमांवर प्रश्नचिन्ह ठेवलं. काही राज्यांनी स्थलांतरितांच्या परतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. स्थलांतरितांच्या परताव्यामुळे कोरोनव्हायरसचा प्रसार वाढत आहे, त्यामुळे ग्रीन झोनमधील भाग लवकरच रेड झोनमध्ये बदलली जातील.
तीन वेळा वाढला लॉकडाऊन
पंतप्रधान मोदींनी 25 मार्चपासून सर्वप्रथम लॉकडाऊन जाहीर केलं.

अधिक वाचा  अंबादास दानवे यांना पक्षात घेण्यासाठी भाजप-शिंदे गटाकडून फोनवर फोन…; दानवेंची भूमिका काय?

पहिलं लॉकडाऊन 21 दिवसांचं होतं. ते 14 एप्रिल रोजी संपणार होतं.

त्यानंतर लॉकडाऊन 19 दिवसांनी वाढवण्यात आलं.

3 मे रोजी बंद होणारं लॉकडाउन पुन्हा 14 दिवसांसाठी वाढवण्यात आलं आहे.

आता लॉकडाउन 17 मे रोजी संपेल.