आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या खासगी आयुष्याविषयी फारसं बोलत नाही. “मला कोणापासून काही लपवायचे नाहीये. माझ्या आयुष्यात ती खास व्यक्ती आहे याचा मला फार आनंद आहे. पण त्याचवेळी या गोष्टी मी फक्त हेडलाइन्ससाठी सांगणार नाही. कारण एक अभिनेत्री म्हणून इतकी वर्षे मी जी काही मेहनत घेतली ती सर्व एका क्षणात मातीमोल होऊन जाईल असं मला वाटतं आणि हे मी सहन करू शकणार नाही,” असं तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं.
‘पिंकविला’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार तापसी एका बॅडमिंटनपटूला डेट करतेय. मॅथिअस बोए असं त्याचं नाव असून तापसीच्या कुटुंबीयांनाही त्याबद्दल माहिती आहे. इतकंच नव्हे तर कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय मी माझं नातं पुढे नेऊ शकणार नाही, असंही ती म्हणाली.
बॉयफ्रेंडविषयी बोलताना ती पुढे म्हणाली, “माझ्या आयुष्यात एक खास व्यक्ती आहे आणि माझ्या कुटुंबीयांना त्याबद्दल पूर्ण माहिती आहे. मला जो व्यक्ती आवडतो तो माझ्या आई-वडिलांना आणि बहिणीलासुद्धा आवडणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांना तो आवडतो. त्यांना आवडला नसता तर मी नात्याला कबुली दिली नसती. मला आठवतंय याबद्दल एका व्यक्तीशी बोलताना मी म्हणाले होते की, जर मम्मी-पप्पांनी नाही ऐकलं, तर मला नाही वाटत की पुढे काही होऊ शकेल.”
तापसीची आई निर्मलजीत पन्नू याविषयी म्हणाल्या, “मला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. ती ज्या कोणत्या व्यक्तीला पसंत करेल, आम्ही तिच्या निर्णयाला पाठिंबा देऊ.”
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत तापसीच्या बहिणीने तापसीच्या बॉयफ्रेंडविषयी खुलासा केला होता.