जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सर्तक झाला आहे. भारताकडून प्रत्युत्तराची कारवाई होण्याची चिंता पाकिस्तानला सतावत आहे. त्यामुळेच पाकिस्तानने सीमेजवळ हवाई गस्त वाढवली आहे. वियॉन वेबसाइटने हे वृत्त दिले आहे. हंदवाडा दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी पाकिस्तानी एअर फोर्सच्या हवाई कसरती सुरु होत्या. भारताला याबद्दल माहिती होती. हंदवाडा चकमकीमध्ये कर्नल, मेजरसह तीन जवान असे एकूण पाच जण शहीद झाले. या घटनेनंतर पाकिस्तानी एअर फोर्सने गस्त वाढवली आहे. यामध्ये F-16 आणि JF-17 या फायटर विमानांचा समावेश आहे.
पाकिस्तानी एअर फोर्सच्या प्रत्येक हालचालीवर भारताचे बारीक लक्ष आहे. भारताने यापूर्वी उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राइक आणि पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला होता. भारत आताही अशीच कारवाई करु शकतो ही भिती पाकिस्तानला आहे. इम्रान खान यांनी केलेल्या टि्वटमधूनही पाकिस्तानची चिंता स्पष्ट दिसून येते.
काय म्हणाले इम्रान खान…
“सध्या तणावग्रस्त परिस्थिती आहे. तिचा फायदा घेत, घुसखोरी होत असल्याचा आरोप भारताकडून होण्याची शक्यता आहे. तसेच याच्या आडून भारत पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाईचा बागुलबोवा उभा करण्याची शक्यता आहे,” असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे.
“पाकिस्तान विरोधात लष्करी कारवाईचा बागुलबोवा उभा करण्यासाठी भारत सातत्याने कारणं शोधत आहे. नियंत्रण रेषेवरुन घुसखोरी होत असल्याचा आरोप तथ्यहीन असून भारताच्या खतरनाक अजेंडयाचा भाग आहे” असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. काश्मीरमध्ये स्थानिक हिंसाचार घडवत असल्याचा उलटा आरोप त्यांनी केला.
भारतातील सत्ताधारी म्हणजे भाजपाच्या धोरणांमुळे दक्षिण आशियातील शांतता धोक्यात येऊ शकते असा आरोपही त्यांनी केला. “भारताच्या बेजबाबदार वर्तनामुळे दक्षिण आशियातील शांतता धोक्यात येऊ शकते. त्याआधी आंतरराष्ट्रीय समुदायाने पावले उचलावी” असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा  भाजप माईंड गेम खेळतंय; काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा खळबळजनक आरोप